BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : माणसातील देव ओळखणे, समाज उन्नतीसाठी गरजेचे – मानव कांबळे

103
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – “देव ही सुंदर कल्पना आहे; पण माणसातील देव ओळखणे हे समाज उन्नतीसाठी जास्त गरजेचे आहे!”  असे विचार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी निगडी येथे व्यक्त केले.

जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधून निगडी येथील अपंग विद्यालय -यमुनानगर या संस्थेला दिलासा संस्थेच्यावतीने पहिला दिलासा पुरस्कार मानव कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संगीतकार पंडित राजू सवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अपंग विद्यालयाचे संचालक विश्वनाथ वाघमोडे यांनी विद्यालयाच्यावतीने पुरस्कार स्विकारला यावेळी प्रमुख पाहुणे सांगवी विकास संघाचे अध्यक्ष महेश भागवत, प्रहार क्रांती संघटनेचे दत्ता भोसले,  दिलासाचे कार्याध्यक्ष प्रकाश घोरपडे, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, अड.अंतरा देशपांडे, सरपंच सुरेश काटे, वैशाली घोडके आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, धान्य, शिधा आणि रोख मदत असे पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्व. लक्ष्मण वाघमोडे यांचे प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी ‘दिलासा’ पुरस्कार प्रदान करण्यामागची भूमिका मांडताना, “जे का रंजले, गांजले। त्यासी म्हणे जो आपुले…”  या संतवचनानुसार आपल्या कार्याने समाजाला दिलासा देणाऱ्या संस्थांचा उचित गौरव व्हावा या उद्देशाने यमुनानगर अपंग विद्यालय या संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिलासा संस्थेने घेतली आहे!” अशा भावना व्यक्त केल्या.

बाळासाहेब घस्ते यांनी गायलेल्या “किसीकी मुस्कराहटोंसे पे हो निसार…” या चित्रपटगीताने; तसेच ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे आणि माधुरी विधाटे यांच्या कविता सादरीकरणाने कार्यक्रमाच्या वातावरण निर्मितीस मदत झाली. सत्काराला उत्तर देताना विश्वनाथ वाघमोडे यांनी, “सन्मान अथवा कौतुकाने आनंद होतो; पण त्याचबरोबर प्रामाणिकपणे केलेल्या कामाची दखल समाजाकडून घेतली जाते, ही जाणीव समाधान देणारी आहे. माझे दिवंगत बंधू यांनी लावलेले संस्थेचे हे रोपटे जपण्याचा मी प्रयत्न करतो आहे!” अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

संगीतकार पंडित राजू सवार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “देव आहे की नाही याची शहानिशा करण्यापेक्षा ज्या कृतीने समाजाला निखळ आनंद मिळतो, ती ‘दिलासा’दायक कृती करणे जास्त महत्त्वाचे असते. पुरस्कारासोबत जीवनावश्यक वस्तुंची सातत्याने मदत करीत राहणे, हे पुरस्काराचे खरे आश्वासक स्वरूप आहे!” असे विचार मांडून साहिर लुधियानवी यांची, “पोछकर आँसू अपनी आँखोंसे मुस्कुराओं तो कोई बात बने…”हे गीत सुरेलपणे सादर केले.

मानव कांबळे पुढे म्हणाले की, “पुरस्कार देणारी आणि घेणारी संस्था यांच्या पात्रतेविषयी कोणताही संभ्रम मनात नाही, हा दुर्मिळ योग आज आहे. समाजात एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के लोक अपंग आहेत. अपंगांविषयी अनेक योजना आणि जनजागृती वाढत असली तरी अजूनही पाहिजे त्या प्रमाणात त्यांना शासनाकडून अथवा समाजाकडून सहकार्य मिळत नाही. आपल्या पुरोगामी राज्यात अपंग, दुर्बल आणि वंचित घटकांना न्याय्य मागण्यांसाठी आक्रोश करावा लागतो, ही मोठी शोकांतिका आहे. सामाजिक जाणीव असलेल्या विचारवंतांनी यासाठी सक्रिय झाले पाहिजे. सामाजिक दृष्टिकोन विस्तारण्यासाठी प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे. प्रचलित व्यवस्थेत सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणे, हे जिवंत माणसाचे लक्षण असते!”

यावेळी साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अपंग विद्यालयाला धान्य, खाऊ आणि रोख रकमेच्या स्वरूपात मदत केली. त्यात नंदकुमार मुरडे, अशोक कोठारी, प्रदीप गांधलीकर, आय.के.शेख, शिवाजीराव शिर्के, सविता इंगळे , निशिकांत गुमास्ते, मनोहर दिवाण, सुप्रिया सोळांकुरे, कैलास भैरट, शरद काणेकर, सुरेश वाळके इत्यादींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या संयोजनात शरद शेजवळ, वैशाली चौधरी, उमेश सणस, तानाजी एकोंडे, शामराव साळुंखे यांनी सहकार्य केले. सुभाष चव्हाण यांनी  प्रास्ताविक केले. माधुरी विधाटे यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब गायकवाड यांनी आभार मानले.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3