Pune : फॉर्च्युनर गाडी खरेदीची रक्कम घेऊन डीलरने केली 32 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फॉर्च्युनर गाडी खरेदीची रक्कम घेऊन सदरची रक्कम टोयोटो कंपनीत न भरता ग्राहकाची 32 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी डिलरच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौरभ सुनील काकडे (वय 32,रा.औंध) असे फसवणूक करणाऱ्या डिलरचे नाव आहे. याप्रकरणी अंकित घनश्याम पटेल (वय 31,रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ काकडे याची औंध येथील भक्ती प्लाझा मध्ये एस.के.ग्रुप कार बाजार मोटारवर्ल्ड नावाने कारची डिलरशिप आहे. फिर्यादी अंकित पटेल यांना टोयोटा कंपनीची फॉर्च्युनर गाडी विकत घ्यायची होती. त्यामुळे त्यांनी गाडीची ऑनलाइन पाहणी करून औंध येथील एस.के.ग्रुप, कार बाजार मोटार वर्ल्ड यांच्याशी संपर्क केला. सौरभ काकडे याने फिर्यादीला आपण टोयोटा कंपनीचे अधिकृत डीलर असल्याचे सांगून 34 लाखांची गाडी 32 लाख 50 हजार रुपयांना देण्याचे आमिष दाखवले.

त्यावर फिर्यादी पटेल यांनी 31 ऑक्टोबर 2018 रोजी डीलरने सांगितल्याप्रमाणे गाडी बुक करण्यासाठी 32 लाख 50 हजार रुपये ऑनलाइन पध्दतीने डिलरच्या खात्यावर जमा केली. परंतु डीलरने ती रक्कम टोयोटा कंपनीत जमा न करता फिर्यादीची फसवणूक केली. याप्रकरणी सौरभ काकडे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक विजय कोळी करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.