Bhosari : इंद्रायणी थडीमध्ये पहिल्याच दिवशी सुमारे 88 लाखांची उलाढाल

सुमारे तीस हजार नागरिकांनी भेट देऊन गाठला गर्दीचा उच्चांक

एमपीसी न्यूज- भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या इंद्रायणी थडी या ग्रामीण महोत्सवाला शुक्रवारी पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून एकाच दिवसात विक्रमी सुमारे तीस हजार लोकांनी भेट दिली. येथे असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलना पसंतीची विशेष पावती मिळाली असून त्यामुळे ते चालवणा-या महिला बचत गटांना मोठ्ठे पाठबळ मिळाले आहे. या एकाच दिवसात सुमारे 88 लाख रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली असून पुढील तीन दिवसात हा आकडा कोटींची मजल सहज पार करेल असा आयोजकांना विश्वास वाटतो.

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अंतर्मुख करायला लावणारा ‘इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव भरविण्यात आला आहे. हा महोत्सव भोसरीमधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान सुरु असून आज शनिवारी (9 फेब्रुवारी) महोत्सवाच्या दुस-याच दिवशी येथे असलेल्या महिला बचत गटांच्या विविध स्टॉलवरील खाद्यपदार्थांचे, शोभेच्या वस्तूंची जोरदार विक्री झाली.

येथे महाराष्ट्राच्या विविध भागातील खाद्यसंस्कृती दर्शवणारे अनेक स्टॉल्स आहेत. यात कोकणी, मालवणी, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेशातील खाद्यसंस्कृती दर्शवणारे शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचे विविध स्टॉल्स आहेत. त्यात मासवडी, खानदेशी पुरणपोळी अर्थात मांडा, मालवणी फिश या स्टॉल्सना लोकांची विशेष पसंती मिळत आहे. त्या स्टॉल्सवर लोकांची तुफान गर्दी असून आपली स्पेशल चव दाखवण्याची संधी या निमित्ताने या सुगरणींना मिळत आहे.

महाराष्ट्राला वेगळी अशी खाद्यसंस्कृती आहे. येथील प्रत्येक भागाची आपली स्वतची अशी खासियत आहे. त्यामुळे मग या अशा जत्रांच्या निमित्ताने येथे वसलेल्या लोकांना आपल्या गावाची आठवण जपण्याची संधी मिळते आणि गावाकडे मिळणारे खाद्यपदार्थ खाण्याची आणि आपल्या मित्रमंडळींना सोबत घेऊन खिलवण्याची संधी मिळते. याच हेतूने या महोत्सवाला भेट देण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली असून आज सकाळपासून दुपारपर्यंतच पंधरा हजारपेक्षा जास्त लोकांनी भेट दिली. तसेच उद्या रविवार असल्याने ही गर्दी वाढून गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे.

येथे खाद्यपदार्थांच्या स्टॉल्ससोबत महिला बचतगटांनी तयार केलेल्या हॅन्डमेड वस्तूंचे देखील भरपूर स्टॉल्स आहेत. भोसरी मतदारसंघातील या महिला बचतगटांना या निमित्ताने एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्यांना आपली कला लोकांसमोर मांडण्याची एक अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. तसेच येथे बालजत्रा, जुनी खेड्यांची रचना दर्शवणारी ग्रामसंस्कृती, शिवकाळातील जुनी शस्त्रात्रे दाखवणारे शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन येथे आहे. त्याला देखील नागरिक मोठ्या संख्येने आणि उत्सुकतेने भेट देत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.