Pune : वेडात मराठे वीर दौडले सात… नाट्यातून उलगडला इतिहास

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे शिवजयंतीनिमित्त जिवंत देखावा

एमपीसी न्यूज- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म… त्यांचे बालपण… तानाजी मालुसरे-शिवाजी महाराज भेट… बहलोलखानाने स्वराज्यात घातलेला धुमाकुळ… बहलोल खानास धुळीस मिळवा महाराजांचे फर्मान… प्रतापराव गुजर यांनी केलेला गनिमीकावा… बहलोल खानाची शरणागती व प्रतापरावांनी पाळलेला शिपाईधर्म… बहलोल खानाला मारल्याशिवाय तोंड दाखवू नका महाराजांनी केलेला आदेश… बहलोल खानची छावणी जवळच असल्याची खबर… आणि अशातच आपल्या सहा सरदांबरोबर प्रतापरावांनी केलेली चढाई… अशा चित्तथरारक प्रसंगातून ५० कलाकारांनी वेडात मराठे वीर दौडले सात हा देखावा प्रत्यक्ष उभा केला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने कोतवाल चावडी येथे शिवजयंती उत्सवानिमित्त वेडात मराठे वीर दौडले सात या जिवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाचे ७७ वे वर्ष होते. महानाटयापूर्वी नादब्रह्म ढोल-ताशा ध्वज पथक ट्रस्ट, पुणे यांचे ढोल-ताशा वादन रद्द करून ट्रस्टचे कार्यकर्ते व पथकातील वादकांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना दीपमानवंदना दिली.

रवींद्र सेनगावकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असलेला एक गुण जरी सर्वांनी आचरणात आणला तर ती त्यांना खरी आदरांजली ठरेल” नुकत्याच पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल ते म्हणाले, “सीआरपीएफ जवानांनी दिलेले हे सर्वोच्च बलिदान आहे. सर्वांनी एकत्र येऊन सरकार जे पाऊल उचलेल त्याच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक आहे. शहिदांच्या बलिदानाचे विस्मरण होता कामा नये”

सुमारे ४० बाय ४५ फूट आकाराच्या दुमजली रंगमंचावर सदाशिव पेठेतील श्रीमंत शिवसाई प्रतिष्ठानच्या कलाकारांनी आपली कला सादर केली. महेंद्र महाडिक या नाट्याचे लेखन, महेश रांजणे यांनी नेपथ्य आणि राहुल सुरते यांनी रंगभूषा केली. याकरिता प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश लोणारे, अतुल दळवी यांनी विशेष मेहनत घेतली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.