BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : उन्हाळा आला…आता आरोग्य सांभाळा

एमपीसी न्यूज- उन्हाळा म्हंटल की प्रचंड उकाडा, अंगावर येणारा घाम, आणि घशाला लागलेली कोरड. मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे. हळू हळू उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. उन्हाळ्यात विविध प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच आरोग्य स्वतःच जपलं पाहिजे.विशेषतः उन्हाळ्यात लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्मघात होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायाबरोबरच काही दक्षता घेणेही तितकेच जरुरीचे असते.

या ऋतूत चेहेरा काळा पडणे, चेहरा तेलकट होणे, त्वचा कोरडी पडणे अशा अनेक समस्या निर्माण होतात.या समस्येपासून सुटका होण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. उन्हाळ्यात खूप घाम येत असल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. शरीरात पाण्याची पातळी कमी झाली कि, त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. यासाठी भरपूर पाणी प्यायले पाहिजे. उन्हापासून आपल्या आरोग्याचे, आपल्या त्वचेचे संरक्षण कसे करता येईल त्यावर आपण एक नजर टाकूया

● हे करा…

॰ भरपूर पाणी प्या,बाहेर जाताना पाण्याची बाटली जवळ बाळगा
॰ उन्हात फिरताना स्कार्फ, कॅप, रुमाल, गॉगल, सनकोटचा वापर करा
॰ बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन लावा
॰ सुती व सैल कपडे घाला
॰ कलिंगड, द्राक्ष, टरबूज, खरबूज यांसारख्या नैसर्गिकरित्या थंडावा देणाऱ्या फळांचे सेवन करा
॰ घरगुती लिंबू पाणी, कोकम सरबत, नारळ पाणी प्या.

● हे करू नये…
॰ प्रखर उन्हाळ्यावेळी मुलांना बाहेर जाऊ देऊ नका
॰ दुपारी १२ ते ३ ३० या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळा
॰ उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नका
॰ उघड्यावरील बर्फ, शीतपेय आणि उसाचा रस पिऊ नका

● उघड्यावरील बर्फापासून सावधान

उन्हाळा सुरू झाल्यावर आपसूकच शीतपेयाची मागणी वाढते. उसाचा रस, बर्फाचे गोळे, फळांचे रस, लस्सी, ताक अशी शीतपेय पिण्याकडे नागरिकांचा ओढा असतो.विशेषकरून लहान मुलांना बर्फाच्या गोळ्याचे फार आकर्षण असते. मात्र या शीतपेयात टाकण्यात येणाऱ्या बर्फाचा दर्जा काय आहे याचा तुम्ही कधी विचार केल्या का? अधिकतर रोग हे या दूषित पाण्यामुळेच होत असतात. बाहेरील पेयात वापरल्या जाणाऱ्या या बर्फामुळे उलट्या, कावीळ, अतिसार,अन्नातून विषबाधा होऊ शकते त्यामुळे बाहेरील बर्फ घातलेली गारेगार शीतपेय टाळावी असा सल्ला बालरोगतज्ञ् डॉ. बागेश्री देवकर यांनी दिला आहे.

● लहान मुलांची काळजी कशी घ्याल? डॉक्टरांचा सल्ला

उन्हापासून बचाव करण्यासाठी विशेषतः लहान मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी सुद्धा जागृत असले पाहिजे.
॰ सहा महिन्याचा मुलांना बाहेर नेण्यापूर्वी साधारण १५ ते २० मिनिटे अगोदर त्यांचा त्वचेला सनस्क्रीन लोशनSPF15 लावावे.
॰ बाहेर पडताना टोपी, फिक्या रंगाचे गळाबंद सैलसर कपडे घालावेत.
॰ सहा महिन्याचा बालकांना शक्यतो सूर्यप्रकाशाच्या संपर्कात अणु नये.
॰ डिहायड्रेशन होऊ नये म्हणून दर १० ते ३० मिनिटांमध्ये मुलांना पाणी देत रहावे.
॰ हेपेटायटिस ए, कांजण्या,टायफॉईडची लस दिली नसल्यास द्यावी.
॰ डायपरचा वापर कमी करा
॰ बाहेरचे पदार्थ टाळा

● उन्हाळ्यात अनेक विकार व आजार उद्भवतात जाणून घेऊयात हे आजार व त्यावरील उपायांवर

१ मूत्रमार्गाचे विकार- उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने लघवीचे प्रमाण कमी होते. लघवी होताना जळजळ होते. मूत्रामध्ये जंतुसंसर्गही होऊ शकतो.
उपाय- यावर भरपूर पाणी पीत राहणे हाच उपाय असतो. पण मूत्रमार्गाचे किंवा मूत्रपिंडाचे खडे झाले असल्यास, वैद्यकीय तपासणी करून योग्य तो उपचार करावा लागतो.
२ पोटाचे विकार – उन्हाळ्यातल्या उष्णतेमुळे आतड्यातील पाण्याच्या प्रमाणात होणाऱ्या बदलामुळे अनेकांना उलट्या-जुलाबाचा त्रास होतो.तसेच उघड्यावरील अन्नपदार्थामुळेही पोटाच्या तक्रारी वाढतात.
उपाय- यासाठी उन्हाळ्यात उकळून पाणी प्यावे तसेच उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.
३ उष्माघात
उन्हात फिरल्याने किंवा काम केल्याने जर थकवा येत असेल किंवा ताप आला असेल तर ती उष्मघाताची प्रारंभिक लक्षणे होय. उष्माघात झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
उपाय- अशी लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीस तातडीने अंघोळ घालावी. त्या रुग्णांचा कपाळावर थंड पाण्याच्या कापडी पट्ट्या ठेवाव्यात, आइस पॅक लावावे कारण वाढलेले शारीरिक तापमान खाली आणणे अत्यंत गरजेचे आहे.
४ डीहायड्रेशन लक्षणे
तोंडाला कोरड पडणे, निस्तेज त्वचा,डोळे, डोकेदुखी
उपाय- भरपूर पाणी प्या,पुरेसा आहार घ्या आणि औषधोपचार करा.

● उन्हाळी आजारात धुळीची भर

सध्या शहरात ठीकठिकाणी विविध विकास कामे सुरु असल्याने धुळीचे लोट निर्माण होत आहेत. या धूलिकणांमुळे डोळे, घास या संबंधीतल्या आजारांना निमंत्रण मिळाले आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क किंवा ओल्या रुमालाचा तोंडावर बांधण्यासाठी वापर करावा.

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशात महानगरपालिकेने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व उद्यानाची वेळ सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 4 ते 8 आहे. मात्र उन्हाळ्याचा वेळेत दुपारी 11 ते 4 या वेळेतही उद्यान खुले ठेवावे. जेणेकरून जेष्ठ नागरिक, कामगार यांना उष्णघाताचा त्रास झाल्यास विश्रांतीसाठी उद्यानात थांबता येईल. त्याचप्रमाणे शहरात अर्बन स्ट्रीट अंतर्गत जो उपक्रम राबविण्यात येत आहे तो सर्व ठिकाणी राबवावा जेणेकरून लोकांना सावलीत बसण्याची सुविधा मिळेल.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like