Vadgaon Maval : शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा

एमपीसी न्यूज- शिवनेरी किल्ल्यावरून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत, पारंपारिक वेशभूषा परिधान करून मिरवणूकीत सहभागी झालेले महिला- पुरूष आणि जय भवानी, जय शिवाजी’ चा जयघोष, शिवपुतळ्याची रथामध्ये ढोल ताशांच्या गजरात काढलेली मिरवणूक अशा उत्साही वातावरणात शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव नुकताच साजरा करण्यात आला.

यावेळी महिलांकरिता खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम झाला. यामध्ये रुपाली तानाजी आसवले या पैठणीच्या मानकरी ठरल्या. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम, सारिका सुनील शेळके, सरपंच सुप्रिया मालपोटे उपस्थित होते.

संध्याकाळी ह.भ.प. गुलाब महाराज खालकर यांनी आपल्या कीर्तनामधून शिवाजी महाराजांच्या जन्माबाबत संपूर्ण इतिहास सांगितला.

आपुलिया हिता जो असे जागता l धन्य मातापिता तयाचिया ‘ll1ll कुळी कन्यापुत्र होती जी सात्त्विक l तयाचा हरिख वाटे देवा ‘ll गीता भागवत करिती श्रवण l अखंड चिंतन विठोबाचे ‘ll तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा l तरी माझ्या दैवा पार नाही ll ‘ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर महाराजांनी निरूपण केले.

जो आपल्या हितासाठी जागरूक असतो, त्याचे आईबाप धन्य होत. जर कुळामध्ये सात्विक वृत्तीची कन्या आणि पुत्र जन्माला आले, तर खुद्द देवालाच त्या गोष्टीचा आनंद होतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या घरात गीता आणि भागवत यांचे श्रवण चालते आणि विठ्ठलाचे अखंड चिंतन चालते, त्या घरातील भक्ताची माझ्या हातून सेवा घडो. तसे झाले तर माझ्या भाग्याला सीमा नाही.

जगाच्या हितासाठी मागणे म्हणजे, शिवाजी राजांनी तुकाराम महाराजांना नजराणा भेट दिला होता, परंतु तुकाराम महाराजांनी माझ्या एकटयावर एवढी संपत्ती खर्च होऊ नये असे सांगत तो स्वीकारला नाही. सज्जनगडावर रामदास स्वामीकडे संपत्ती पाठवली होती त्यांनीही तिचा स्विकार केला नाही. अशा कथा सांगून ह.भ.प. गुलाब महाराज खालकर यांनी तुकाराम महाराज, रामदास स्वामी, शिवाजी महाराज यांची थोरवी सांगितली.

कार्यक्रमाचे आयोजन उपसरपंच स्वामी जगताप, योगेश मोढवे, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक दिलीप आंबेकर, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आंबेकर, माजी अध्यक्ष बाबाजी आसवले, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप मोढवे, उपाध्यक्ष रोहिदास उर्फ बाळासाहेब खुरसुले आणि समितीचे सर्व पदाधिकारी आदींनी केले.

याप्रसंगी मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष नरहरी केदारी, तुकाराम गाडे, तुकाराम असवले, काळूराम मालपोटे, अंकुश आंबेकर, महादु सातकर, मारूती असवले,अनिल मालपोटे, सुधाकर शेळके, विलास मालपोटे, नारायण ठाकर, संभाजी टेमगिरे, काळूराम घोजगे, शिवाजी वारींगे, संभाजी गुणाट, विकास खांडभोर, रोहिदास असवले, शांताराम असवले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ, संत जनाबाई महिला भजनी मंडळ, मुक्ताबाई संत सेवा भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी टाकवे बु. व मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदायातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.