Pimpri :  शहरात ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात ; ‘एक गाव एक शिवजयंती’ला जास्त पसंती

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार साजरी केली जाणारी जयंती गुरूवार (दि.12) शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. बहुतेक मंडळानी एक गाव एक शिवजयंतीलाच जास्त पसंती दिली. भव्य मिरवणूक, ढोल ताशे आणि पारंपारीक वेशभूषा व वाद्य यांच्या सह्याने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. 

अखिल साईनाथ नगर, निगडी येथे “एक गाव एक शिवजयंती” साजरी करण्यात आली. यामध्ये साईनाथ नगर मधील सर्व सोसायटी आणि  गणेश मंडळांनी सहभाग घेतला. याप्रसंगी विविध उपक्रम राबवण्यात आले ज्यामध्ये गडकिल्लांचे छायाचित्र प्रदर्शन, जेष्ठ नागरिकांसाठी आयकॉन हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य शिबीर, सिद्धिविनायक मंदिर येथे घेण्यात आले तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी मृत्युंजय ढोल पथकाच्या आकर्षक वादनाने छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

अखिल टाळगाव चिखली ग्रामस्थांच्या वतीने ‘एक गाव एक शिवजयंती’ उत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 200 व्यक्तींनी रक्तदान केले. तर नेत्र तपासणी , दंत तपासणी , मधुमेह तपासणी आणि लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.मिरवणुकीत  25 फुटी शिव रथ आणि अठरापगड जातीतील विविध संतांचा चित्ररथ आणि श्री राम प्रभूंची 15 फूट उंच मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत पारंपारिक संभळ पथक ,पालखी ,बैलगाडी ,राजस्थानी गेर नृत्य ,ढोल पथक ,सहभागी झाले होते.

चिंचवड येथील शिवतेज नगर, पूर्णा नगर, फुले नगर व शाहू नगर, संभाजी नगर येथील 45 मंडळे व संस्था यांच्यासह 1000 कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग घेत शिवजयंती साजरी केली. सजविलेलेले अश्व, उंट, चांदीचा विद्युत रोषणाईचा रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आळंदी येथील 25 वारकरी मंडळ ,दोन ढोल पथके, मार्गावर रांगोळी पायघड्या, सनई चौघडा, सहा मंडळाचे ऐतिहासिक सजविले रथ तसेच पारंपरिक वेशभूषेत सुमारे एक हजार शिवप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.