BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ सुनेत्रा पवार यांनी साधला महिला कार्यकर्त्यांशी संवाद

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागाची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे शेतकरी आणि महिलांची परिस्थिती भयानक आहे. खासदारांनी या लोकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी काय केले ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मातु:श्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी (ता.23) केला. आजोबा आणि वडिलांच्या कार्याचा वसा पार्थ सिध्द करून दाखवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वडगाव मावळ येथे मावळ तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित प्रचार नियोजनाच्या पदाधिका-यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, डॉ. सुजाता मोरे, पश्चिम महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे, युवती तालुकाध्यक्षा सुमित्रा दौंडकर, राजश्री म्हस्के, तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, शालिनी खळदे, अल्पसंख्यांक सेलच्या तालुकाध्यक्षा शबनम खान, ओबीसी सेल अध्यक्षा संध्या थोरात, शहराध्यक्षा सुनीता काळोखे, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, माजी नगरसेविका तनुजा जगनाडे, माधुरी कालेकर, माजी जि.प. सदस्या ललिता कोतूळकर, शैलजा काळोखे, देहूरोड शहराध्यक्षा शीतल हगवणे, उमा शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सुनेत्रा पवार यांचा सत्कार अर्चना घारे यांच्या हस्ते करण्यात आला.

भाजपा सरकारने नोटबंदीच्या लादलेल्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था उध्वस्त झाली असून तेथील परिस्थिती भयानक असल्याचा आरोप करून सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, ” महिला पदाधिका-यांनी घरटी भेटी देवून जे सत्य आहे ते योग्य पध्दतीने महिलांना सांगितले पाहिजे. खोटा प्रचार अजिबात करू नका. ज्यांनी खोटे रेटून बोलायचा धडाका लावला आहे, ते लोकांना माहित झाले आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा. निवडणुकीच्या वातावरणात अतिउत्साहात बारिकसारिक चुका होण्याची शक्यता असते, अशा चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. पार्थमुळे मावळच्या समस्य़ा जाणून घ्यायची संधी मिळाली आहे” पार्थ हा संस्कारातून वाढलेला आहे. त्यामुळे तो नवखा असला तरी एक दिवस आजोबा आणि वडिलांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा वसा सिध्द करून दाखवेल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केल्या. प्रचाराचे दिवस कमी असल्याने सोशल मीडियावरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत संपर्कात राहण्याचा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला.

महिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगून जिल्हाध्यक्षा नागवडे यांनी महिलांची प्रचार यंत्रणा, प्रचाराचे विभागवार नियोजन आणि प्रचारातील ठळक मुद्दे यावर मार्गदर्शन केले. एक कार्यकर्ती, दहा घर दररोज असा घरटी संपर्क करून घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मतदाराकडून प्रत्यक्ष मतदानात परिवर्तन करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला. गण, वॉर्ड आणि प्रभागनिहाय प्रचार यंत्रणा मतदान संपेपर्यंत नेटाने राहविण्याचे आवाहन त्यांनी केले.

बेरोजगारी, महागाई, गॅस सिलेंडरच्या दुप्पट किमती, शेतीपूरक मालाचे घसरलेले भाव, धनगर, मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबाबत सरकारने खोटे बोलण्याचा लावलेला धडाका या आणि विविघ समस्यांवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेचा उमेदवार प्रतिस्पर्धी असल्याने शिवसेनेच्या कारभाराविरोधात प्रामुख्याने भर देण्याचे आवाहन पुणे शहर युवती अध्यक्षा मनाली भिलारे यांनी केले.

महिलाकडून होणा-या प्रचार नियोजनाचा आढावा अर्चना घारे यांनी घेतला. शरद पवार यांनी महिलांसाठी 50 टक्के आरक्षण दिल्याने आज महिलांना मिळालेल्या संधीचे पुन:स्मरण त्यांनी यावेळी करून दिले. शबनम खान यांनी प्रास्ताविक केले. सुमित्रा दौंडकर यांनी स्वागत केले. आभार सुवर्णा राऊत यांनी मानले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.