Maval : जिंकण्याचा विश्वास घेऊन मतदारांपर्यंत जा – माजी खासदार रामशेठ ठाकूर

एमपीसी न्यूज- खासदार बारणे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचे आहे. त्यांनी मागील पाच वर्षात केलेली कामे घेऊन आणि जिंकण्याचा विश्वास घेऊन मतदारांपर्यंत पोहोचा, असा सल्ला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना दिला. उलवा, नोड, शेलघर विभागातील महायुती कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

मेळाव्यासाठी शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, माजी महापौर दत्ता दळवी, बाबनदादा पाटील, महेश राळकर, अरुण भगत, रंगनाथ पाटील, उलवा, नोड, शेलघर विभागातील महायुतीचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

रामशेठ ठाकूर म्हणाले, “पार्थ पवार यांना बारामतीहून मावळला टाकण्याची गरज नव्हती. मध्यावधीच्या कालावधीत भाजप – शिवसेना यांच्यामध्ये काही कारणांवरून मतभेद झाले. हे मतभेद वैचारिक होते. विकासकामे आणि अन्य मुद्द्यांवर हे मतभेद होते. यामुळे दोन्ही पक्ष आणि पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मनभेद कधीच झाले नाहीत. आता पुन्हा एकदा शिवसेना, भाजप, रिपाई, रासप, रयत क्रांती संघटना यांची महायुती झाली आहे. महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी उमेदवारांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. खासदार श्रीरंग बारणे यांना आपल्याला पुन्हा एकदा लोकसभेत पाठवायचे आहे.”

आमदार मनोहर भोईर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आजवर अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. जीएसटी हा त्यातला एक चांगला निर्णय आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांची गंगाजळी देशाच्या तिजोरीत आली आहे. विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी 56 उमेदवार आहेत, पण महायुतीकडे केवळ एकच 56 इंच छातीचा उमेदवार आहे. खासदार बारणे यांना रायगड मधून एक लाखांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.