Shirur : माझ्यावर टीका करण्यासाठी विरोधकांकडील मुद्दे संपले ! – आढळराव पाटील

खासदार आढळराव पाटील यांचा आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्रचार दौरा

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघात मी अनेक महत्त्वाचे प्रकल्प मंजूर करुन आणले. रात्रंदिवस जनतेच्या संपर्कात राहिलो. त्यामुळे माझ्यावर टीका करण्यासाठी विरोधकांकडे मुद्देच शिल्लक राहिले नाहीत असा दावा शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.

खासदार आढळराव पाटील यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या शिरुर तालुक्‍यातील सविंदणे, मिडगूलवाडी, कवठे, मलठण, आमदाबाद, दुडेवाडी, निमगाव दुडे, रावडेवाडी, टाकळीहाजी, वडनेर, जांबूत, फाकटे, चांडोह, पिपरखेड आणि काठापूर आदी गावांचा जनसंपर्क दौरा केला. या दौऱ्याप्रसंगी कवठे येथे झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.

आढळराव पुढे म्हणाले, ” भीमाशंकर, अष्टविनायक गणपती देवस्थानांना जोडणारे रस्ते असो वा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून केलेला कवठे ते गांजवेवस्ती रस्ता असो. शिरुर लोकसभा मतदारसंघात मी अनेक महत्त्वाचे प्रकल्प मंजूर करुन आणले. रात्रंदिवस जनतेच्या संपर्कात राहिलो. त्यामुळे माझ्यावर टीका करण्यासाठी विरोधकांकडे मुद्देच शिल्लक राहिले नाहीत. म्हणूनच नसलेले प्रश्‍न उपस्थित करुन जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. तुमच्या कुठल्याही खासदाराची कामगिरी आणि माझ्या कामांची तुलना करा. तुमचा एकही खासदार माझ्या जवळपासही फिरकू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे “

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.