Astrologer’s Point of view: सूर्यग्रहण कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे फल!

Astrologer's Point of view: Solar eclipses in India, rules to follow during that period, and the fruits of the zodiac!

एमपीसी न्यूज – खगोलशास्त्रीय दृष्ट्या कंकणाकृती ग्रहण ही दुर्मिळ घटना मानली जाते. खगोलशास्त्राप्रमाणे भारतातील प्राचीन ज्योतिषशास्त्रात देखील ग्रहणांविषयी सखोल माहिती देण्यात आलेली आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून उद्या (रविवारी) होणाऱ्या सूर्यग्रहणाविषयी ज्योतिष फलित विशारद प्राजक्ता जोशी यांचा विशेष लेख –

प्राजक्ता जोशी

सूर्यग्रहण

ज्येष्ठ अमावास्या, 21 जून 2020, रविवार या दिवशी भारताच्या राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडातील काही प्रदेश येथे सकाळी दहाच्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे.

सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र येऊन चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ती ज्या भागात पडते, तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्यासारखे दिसते. सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले, तर ‘खग्रास सूर्यग्रहण’ आणि सूर्यबिंब अपूर्ण झाकले गेले, तर ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ होते. सूर्यबिंब कंकणाच्या (स्त्रियांच्या हातातील बांगडीच्या) आकारात झाकले गेले, तर दिसणार्‍या ग्रहणाला ‘कंकणाकृती ग्रहण’ म्हणतात. कंकणाकृती सूर्यग्रहणात सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसत नाही; परंतु सूर्याबाहेरचा भाग बांगडीसारखा चमकतो. सूर्यग्रहण केवळ अमावास्येलाच होते. ‘महर्षि अत्रिमुनि’ (काही ग्रंथांमध्ये ‘अत्रिमुनि’ याऐवजी ‘आर्ट्रीमुनि’ असा उल्लेख आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी.) हे ग्रहणाविषयी ज्ञान देणारे पहिले शिक्षक होते.

भारतात सर्वत्र दिसणार्‍या सूर्यग्रहणाच्या वेळा

‘हे ग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, दक्षिण युरोपचा काही भाग आणि ऑस्ट्रेलियाचा उत्तरेकडील प्रदेश या प्रदेशांमध्ये  दिसणार आहे. समवेत दिलेल्या भारताच्या नकाशातील छायांकित केलेल्या राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तरखंडातील काही प्रदेश येथे कंकणाकृती अवस्था पहावयास मिळेल. उर्वरित संपूर्ण भारतात हे ग्रहण ‘खंडग्रास ग्रहण’ दिसेल. हे ग्रहण 21 जून 2020 ला सकाळी 10.01 पासून दुपारी 1.28 पर्यंत आहे.’ (संदर्भ : दाते पंचांग)

अ. सूर्यग्रहणाच्या वेळा (खालील वेळा मुंबईच्या आहेत.)

अ 1. स्पर्श (आरंभ) : 21 जून 2020 ला सकाळी 10.01

अ 2. मध्य : 21 जून 2020 ला सकाळी 11.38

अ 3. मोक्ष (शेवट) : 21 जून 2020 ला 13.28.२८ (दुपारी 1.28)

अ 4. ग्रहणपर्व (टीप १) (ग्रहण आरंभापासून शेवटपर्यंतचा एकूण कालावधी) : 3 तास 27 मिनिटे

टीप १ – पर्व म्हणजे पर्वणी किंवा पुण्यकाल होय. ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा काल पुण्यकाल आहे. ‘या काळात ईश्‍वरी अनुसंधानात राहिल्यास आध्यात्मिक लाभ होतो’, असे शास्त्रात सांगितले आहे.

आ. ग्रहणाचे वेध लागणे

आ 1. अर्थ : सूर्यग्रहणापूर्वी सूर्य चंद्राच्या छायेत येऊ लागतो. त्यामुळे त्याचा प्रकाश हळूहळू न्यून होण्यास आरंभ होतो. यालाच ‘ग्रहणाचे वेध लागले’, असे म्हणतात.

आ 2. कालावधी : ‘हे सूर्यग्रहण दिवसाच्या दुसर्‍या प्रहरात (टीप 2) असल्याने शनिवारी 20 जून 2020 या दिवशी रात्री 10 वाजल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंत, म्हणजे 21 जून 2020 च्या दुपारी 1.28 पर्यंत वेध पाळावेत.’ (संदर्भ : दाते पंचांग)

टीप 2 – एक प्रहर 3 तासांचा असतो. दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4 प्रहर मिळून एका दिवसात एकूण 8 प्रहर असतात.

सूर्यग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम

‘वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य आणि श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन निषेध आहे; म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत; मात्र आवश्यक असे पाणी पिणे, मल-मूत्रोत्सर्ग आणि विश्रांती घेणे, ही कर्मे करता येतात. ग्रहणपर्व काळात (सकाळी 10.01 ते 13.28 या कालावधीत) मात्र पाणी पिणे, मल-मूत्रोत्सर्ग आणि झोपणे ही कर्मे निषिद्ध असल्याने करू नयेत. बालके, अशक्त आणि रुग्णाईत व्यक्ती, तसेच गर्भवती स्त्रिया यांनी 21 जून 2020 या दिवशी पहाटे 4.45 पासून ग्रहणमोक्षापर्यंत वेध पाळावेत.’ (संदर्भ : दाते पंचांग)

अ. आरोग्याच्या दृष्टीने वेधनियम पाळण्याचे महत्त्व !

अ 1. शारीरिक आणि भौतिक स्तर : वेधकाळात जीवाणू वाढत असल्याने अन्न लवकर खराब होते. या काळात रोगप्रतिकारशक्ती न्यून असते. ज्याप्रमाणे रात्रीचे अन्न दुसर्‍या दिवशी शिळे होते, त्याप्रमाणे ग्रहणापूर्वीचे अन्न ग्रहणानंतर शिळे मानण्यात येते. त्यामुळे ते अन्न टाकून द्यावे. केवळ दूध आणि पाणी यांना हा नियम लागू नाही. ग्रहणापूर्वीचे दूध आणि पाणी ग्रहण संपल्यावरही वापरू शकतो.

अ 2. मानसिक स्तर : वेधकाळात मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. ‘काही व्यक्तींना निराशा येणे, ताण वाढणे इत्यादी मानसिक त्रास होतात’, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.

ग्रहणकालात केलेल्या साधनेचे फळ सहस्रो पटींनी अधिक प्रमाणात मिळते. यासाठी ग्रहणकाळात साधनेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. वेधारंभापासून ग्रहण संपेपर्यंत नामजप, स्तोत्रपठण, ध्यानधारणा इत्यादी धार्मिक कार्यांत मन गुंतवल्यास त्याचा लाभ होतो.

ग्रहणकालातील वर्ज्यावर्ज्य कृती

अ. वर्ज्य कृती : ‘ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) ‘झोप, मल-मूत्रविसर्जन, अभ्यंग (संपूर्ण शरिराला कोमट तेल लावून ते शरिरात जिरेपर्यंत मर्दन करणे), भोजन, खाणे-पिणे आणि कामविषयाचे सेवन’ ही कर्मे करू नयेत.

आ. कोणती कर्मे करावीत ?

1. ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे.

2. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम आणि दान करावे.

3. पूर्वी काही कारणाने खंडित झालेल्या मंत्राच्या पुरश्‍चरणाचा आरंभ या कालावधीत केल्यास त्याचे फळ अनंत पटींनी मिळते.

4. ग्रहणमोक्षानंतर स्नान करावे.

एखाद्या व्यक्तीला अशौच असल्यास ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान आणि दान करण्यापुरती तिला शुद्धी असते.

ग्रहणाचे राशीपरत्वे फल

अ. शुभ फल : मेष, सिंह, कन्या आणि मकर

आ. अशुभ फल : मिथुन, कर्क, वृश्‍चिक आणि मीन

इ. मिश्र फल : वृषभ, तुला, धनु आणि कुंभ

ज्या राशींना अशुभ फल आहे, त्या व्यक्तींनी आणि गर्भवती महिलांनी हे सूर्यग्रहण पाहू नये.’ (संदर्भ : दाते पंचांग)

सूर्यग्रहण पहातांना घ्यावयाची काळजी

‘कंकणाकृती आणि खंडग्रास सूर्यग्रहण पहातांना ग्रहण पहाण्यासाठी तयार केलेले विशेष चष्मे किंवा काजळी लावलेली काळी काच किंवा ‘सूर्याचे प्रखर किरण डोळ्यांपर्यंत पोचू नयेत’, यासाठी उपलब्ध साधनांचा वापर करूनच ग्रहण पहावे. कोणत्याही कारणास्तव नुसत्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहू नये. ग्रहणाची छायाचित्रे काढणार्‍यांनी विशिष्ट फिल्टरचा उपयोग करूनच छायाचित्रे काढावेत, अन्यथा डोळ्यांना इजा पोचू शकते.

या ग्रहणामध्ये कंकणाकृती अवस्था 40 सेकंदांपर्यंत दिसणार असल्याने त्या कालावधीत पूर्णवेळ डोळ्यांवर ग्रहण पहाण्याचा चष्मा लावूनच ठेवावा. यानंतर पुन्हा 21 मे 2031 या दिवशी दक्षिण भारतामध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. यापूर्वी 15 जानेवारी 2010 आणि 26 डिसेंबर 2019 या दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण भारताच्या दक्षिणेकडील काही प्रदेशांत दिसले होते. यावर्षी ज्येष्ठ अमावास्या, 21 जून 2020, रविवार या दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भारताच्या उत्तरेकडील प्रदेशात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण खंडग्रास दिसणार आहे. कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार्‍या गावांची सूची स्वतंत्र दिलेली असून हे ग्रहण खंडग्रास दिसणार्‍या काही प्रमुख गावांची सूची लेखाच्या शेवटी दिलेली आहे.’ (संदर्भ : दाते पंचांग)

ग्रहणातील स्नानाविषयी माहिती

‘ग्रहणात सर्व उदक गंगेसमान आहे, तरीही उष्णोदकाहून शीतोदक पुण्यकारक, पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वहाते पाणी, सरोवर, नदी, महानदी, गंगा, समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ आणि पुण्यकारक आहे. सूर्यग्रहणात नर्मदास्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. नर्मदास्नान शक्य नसल्यास स्नानाच्या वेळी नर्मदेचे स्मरण करावे.’ (संदर्भ : दाते पंचांग)

सूर्यग्रहणात साधनेचे महत्त्व

ग्रहणकालातील विशेष वातावरणाचा परिणाम प्रत्येक सजिवावर होतो. चंद्रग्रहणापेक्षा सूर्यग्रहणाचा काळ साधनेसाठी अधिक पोषक असतो. ज्योतिष, धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या ग्रहणकाल महत्त्वाचा मानला आहे. ग्रहणकाल हा संधिकाल असल्याने या काळात केलेल्या साधनेचा परिणाम लगेच जाणवतो. ग्रहणकालातील जप आणि दान यांचे महत्त्व अनंत पटींनी मिळते. यासाठी ग्रहणमोक्षानंतर आपल्या ऐपतीनुसार दान करावे. सूर्यग्रहणात नवीन मंत्र घेण्यास आणि मंत्राचे पुरश्‍चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्य काल आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्‍चरण ग्रहण पर्वकालामध्ये केल्याने मंत्र सिद्ध होतो. सूर्यग्रहणात श्री गुरूंचे अनन्यभावे स्मरण करून पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्र मनाने केलेल्या जपाने शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि व्यवहारिक त्रास नष्ट होतात. सर्व कार्यांत सफलता मिळते. ग्रहणकालात जप करण्यासाठी माळेची आवश्यकता नसते. ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतची संपूर्ण वेळ अतिशय महत्त्वाची असते.’

‘खंडग्रास ग्रहण’ दिसणारी गावे आणि शहरे

नगर, अकोला, अमरावती, नागपूर, संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सावंतवाडी, ठाणे, पणजी यांसह महाराष्ट्रातील आणि देशातील 133 ठिकाणी ‘खंडग्रास ग्रहण’ दिसणार आहे.

कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार्‍या गावांची नावे

सूरतगढ (राजस्थान), हरियाणातील सिरसा, कुरुक्षेत्र, यमुनानगर आणि उत्तराखंडमधील जोशीमठ

प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

स्थानिक संपर्क – 7038713883

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.