Pimrpri corona Update : शहरातील कोरोनाचा आलेख घसरतोय !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता आलेख उतरणीस येत आहे. जुलै, ऑगस्टचा पूर्ण महिना आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील कोरोनाचा वाढता आलेख चिंतेचा विषय होता. पण, आता रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. दिवसाची रुग्णसंख्या एक हजाराच्या आतमध्ये आली आहे. कोरोनाचा आलेख उतरणीस येत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, शहरातील रुग्णवाढ थोडी कमी झाली ही वस्तुस्थिती आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे कमी झाली हे निश्चित सांगता येत नाही. पण ही अंतिम नाही. त्यामुळे कोणीही बेफिकीर राहू नये. कायम काळजी घेणे आवश्यक आहे, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. मार्च, एप्रिल आणि अर्धा मे महिना कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात होती.

जून, जुलै, ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग मोठा राहिला. जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यात कोरोनाची सर्वाधिक रुग्णवाढ झाली. जुलै महिन्यात मृत्यूचे प्रमाण देखील सर्वात जास्त होते. त्याखालोखाल ऑगस्टमध्ये मृत्यूचे प्रमाण होते. त्या तुलनेत सप्टेंबरमध्ये हे प्रमाण कमी आहे.

31 ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 49 हजार 330 होती. सप्टेंबरच्या पंधरवड्यात रुग्णसंख्या वाढीचा आलेख उंचावला होता. गणेशोत्सवादरम्यान कोरोना प्रादुर्भाव, प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला. गणपतीनंतर जी रुग्ण वाढ झाली ती मागील आठवड्यापर्यंत सुरू होती. त्यानंतर रुग्णवाढ कमी होताना दिसून येत आहे.

चार ते पाच दिवसांपासून रुग्णवाढ एक हजाराच्या आतमध्ये आली आहे. दिवसाला हजाराच्या आतमध्ये नवीन रुग्ण सापडत आहेत, ही दिलासादायक बाब मानली जात आहे. सप्टेंबर महिन्यात सुमारे 28 हजार नवीन रुग्णांची भर पडली आहे.

आजमितीला शहरातील एकूण रुग्णसंख्या 77 हजार 317 वर पोहोचली आहे. त्यातील 64 हजार 284 जण बरे होऊन घरी गेले आहेत. केवळ 13 हजार 33 सक्रिय रुग्ण शहरात आहेत.

सक्रिय रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे, ही दिलासादायक बाब आहे. तर, शहरातील 1306 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 484 अशा 1790 जणांचा कालपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरातील रुग्णवाढ थोडी कमी झाली ही वस्तुस्थिती !

याबाबत  अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ”पुण्यासह सगळीकडचीच रुग्णवाढ कमी झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णवाढ थोडी कमी झाली ही वस्तुस्थिती आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे निश्चित सांगता येत नाही. परंतु, ऑगस्टमध्ये देखील असा काही कालावधी आला होता. रुग्णालयात ऍडमिशनची मागणी कमी झाली होती. पण, त्यांनतर पुन्हा वाढली होती. त्यामुळे रुग्णवाढ कमी होतेय हे जरी चांगले लक्षण असले तरी यामुळे निर्धास्त होण्याचे काही कारण नाही. संपर्कातून होणारा हा आजार आहे. त्यामुळे बेफिकीर न राहता काळजी घेतलीच पाहिजे. क्षमता वाढवतच रहावे लागणार आहे. आगामी सणांच्या काळात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. प्रसार होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. स्वतःची, कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सुरक्षित अंतर पाळणे, मास्क परिधान करणे, हात सॅनिटायझेशन याचे पालन केलेच पाहिजे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.