Hinjawadi News : चुकीला माफी नाही ! तक्रारदार तरुणीच्या घरात जाऊन महागडे घड्याळ चोरणारा फौजदार निलंबित

एमपीसी न्यूज – चहा पिण्याच्या बहाण्याने तक्रारदार तरुणीच्या घरात जावून फौजदाराने ॲपल कंपनीचे महागडे घड्याळ चोरले. प्रकरणी पोलीस आयुक्तांनी फौजदाराचे तडकाफडकी निलंबन केले. हा प्रकार हिंजवडी परिसरात घडला आहे.

प्रशांत राजेंद्र रेळेकर (नेमणूक- हिंजवडी पोलीस ठाणे) असे निलंबित फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी एका 25 वर्षीय तरुणीने तक्रार केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार तरुणीचा भाऊ बेपत्ता झाला आहे. याबाबत 24 एप्रिल रोजी तरुणी तक्रार देण्यासाठी रात्री उशिरा हिंजवडी पोलीस ठाण्यात गेली. त्यावेळी तक्रार घेतल्यानंतर रेळेकर तरुणीला सोडण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला.

दरम्यान, गाडीमध्ये “आपण कधीही हॉटेलवर जाऊ शकतो, मी तुमच्यासाठी कोणतेही हॉटेल उघडायला सांगेन. मी उद्या मिरजेला चाललो आहे. तू पण माझ्या सोबत चल’, असे बोलून फौजदाराने तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घाबरलेल्या तरुणीने रेळेकरला नकार दिला.

घरी पोहचल्यानंतर रेळेकर याने “आपण खूप कंटाळलो आहे” असे सांगून तरुणीकडे चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. तरुणीने नाईलाजास्तव रेळेकरला चहा पिण्यासाठी घरात घेतले. त्यावेळी तरुणीची आई देखील घरात होत्या. दरम्यान, चहा पिताना रेळेकर याने चार्जिंगला लावलेले ॲपल कंपनीचे घड्याळ खिशात घातले.

तरुणीने दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात धाव घेत वरिष्ठांच्या कानावर हा विषय घातला. वरिष्ठांनी झाडाझडती घेतल्यानंतर रेळेकर याने तरुणीचे घड्याळ माघारी दिले. रेळेकर यांच्या वागणुकीमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्यांचे निलंबन केले. याबाबतचे आदेश आयुक्तांनी शुक्रवारी (दि. 30) दिले आहेत.

माझ्याकडे चुकीला माफी नाही

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “सामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देशाने जर कोणीही गैरप्रकार करीत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. सगळीकडे असे प्रकार घडत असतात. मात्र, पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली जाईल या भीतीने प्रकरण दाबण्यात येते. मात्र, माझ्याकडे चुकीला माफी नाही. मी कोणालाही पाठीशी घालत नाही.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.