Pune Lockdown News: जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळता अन्यत्र सध्याचे निर्बंध कायम!

एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्याच्या उर्वरित भागात सध्याचे निर्बंध 15 जूनला सकाळी सात वाजेपर्यंत कायम राहतील, असा आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आज काढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्बंध शिथिल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जिल्ह्यातील सर्व छावणी क्षेत्रे, सर्व नगरपालिका व ग्रामपंचायतींसाठी हा आदेश लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांनी म्हटले आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात उद्यापासून (सोमवारपासून) सर्व प्रकारची दुकाने शनिवार व रविवार वगळता सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र महापालिका क्षेत्र वगळता अन्य भागातील अत्यावश्यक सेवा सोडून अन्य दुकाने पुढील आदेशापर्यंत बंदच ठेवावी लागणार आहेत. मेडिकल स्टोअर्स वगळता अन्य अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी सात ते 11 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.