Pimpri: लष्करी सेवा करणा-या खेळाडूचा महापौर जाधव यांनी केला गौरव  

एमपीसी न्यूज – देशसेवेसाठी योगदान देणा-या लष्करी अधिकारी, खेळाडूचा महापालिकेला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग शहरातील खेळाडू घडविण्यासाठी करण्यात येणार असल्याचे, महापौर राहुल जाधव यांनी सांगितले. लष्करी सेवा करणारे खेळाडू मुरलीकांत पेटकर यांचा महापौर जाधव यांनी नुकताच त्यांच्या काळेवाडी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. महापालिकेतर्फे त्यांचा यथोचित सन्मान केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

महापौर जाधव म्हणाले, ‘देशासाठी खूप मोठे योगदान देणारे देशभक्त आहेत. अशा दिग्गज खेळाडूंच्या अनुभवाचा उपयोग शहरातील क्रीडा विश्वासाठी करण्यात येणार आहे. शहरातील क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी अशा गुणी खेळाडूंचा समावेश क्रीडा धोरणात केला जाणार आहे. याविषयी पेटकर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली’.

पेटकर यांनी हाइडलबर्ग, जर्मनी येथे 1972 मध्ये पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. त्यांनी 50 मीटर फ्री-स्टाइल पोहण्याच्या स्पर्धेत 37.33 सेकंदांमध्ये अंतर पार करुन जागतिक विक्रम प्रस्थापिक केला होता. त्याचवर्षी त्यांनी अचूक भालाफेक व अडथळ्यांची शर्यत यामध्ये सहभाग घेऊन या तीनही स्पर्धांमध्ये ते अंतिम फेरीत पोहचले होते. याशिवास हाँगकाँग येथे 1982 मध्ये झालेल्या फेस्पिक क्रीडास्पर्धेत पोहण्याच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण व कांस्यपदके मिळविली होती.

राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध क्रीडास्पर्धांमध्ये पेटकर यांनी 140 हून अधिक पदके जिंकलेली आहेत. महाराष्ट्रातील क्रीडापटूंसाठीचा सर्वोच्च छत्रपती पुरस्काराने देखील पेटकर यांचा सन्मान करण्यात आला आहे. असा खेळाडू आपल्या शहरात वास्तव्यास आहे, ही आनंदाची बाब आहे, असे महापौर जाधव म्हणाले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.