Pune : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त औंध महाविद्यालयात शोधनिबंध कार्यशाळा

एमपीसी न्यूज – माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘पोस्टर सादरीकरण व शोधनिबंध कार्यशाळा’ घेण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. एकनाथ झावरे, प्रा. मयुर माळी, डॉ.अतुल चौरे हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना रत्नपारखी म्हणाले की, शरद पवारांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे. महाराष्ट्रातील सर्वच शिक्षण संस्थांच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार होण्यामागे त्यांनी महत्त्वाची भूमिका अदा केली आहे. शरद पवार हे 29 वर्षापासून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने रयत विज्ञान प्रकल्पाची आणि गुरुकुल प्रकल्पाची सुरुवात झाली. आज हे दोन्ही प्रकल्प सुस्थितीमध्ये सुरू आहेत.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या की, पवार साहेब यांनी रयत शिक्षण संस्थेत विज्ञान परिषद आणि स्पर्धा परीक्षेची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे अनेक महाविद्यालयातील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्र सादर करण्याची संधी मिळू शकली. या संशोधन कार्यशाळेमुळे अनेक शिक्षकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर करण्याची संधी मिळू शकते.

या संशोधन कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील शिक्षकांनी सहभाग घेतला. यासाठी परीक्षक म्हणून डॉ. सर्फराज मुजावर (वाय. सी. कॉलेज, सातारा.) शहाजी मोरे (महात्मा फुले कॉलेज, पिंपरी.) जी. एम. तावरे (शाहू विद्यालय, बारामती. (श्री नागेश्वर विद्यालय, पाटस.) काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. संजय नगरकर यांनी तर आभार प्रा. कुशल पाखले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.