पिंपळे गुरव येथे भरले अनोखे पर्यावरणपूरक कविसंमेलन

एमपीसी न्यूज – पर्यावरणाचा ऱ्हास रोखून पर्यावरणजागृती व्हावी, या उद्देशाने शब्दधन काव्यमंच आणि मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थांच्या (Pimple Gurav) संयुक्त विद्यमाने ‘कवी झाडावर… कविता पर्यावरणावर!’ हे साहित्यविश्वातील अनोखे कविसंमेलन सृष्टी चौकाजवळ, पिंपळेगुरव येथे एका विशाल वृक्षाच्या सान्निध्यात रविवारी (दि.12) संपन्न झाले.

यावेळी ज्येष्ठ पर्यावरणवादी साहित्यिक तानाजी एकोंडे अध्यक्षस्थानी होते; तसेच सुप्रसिद्ध कवी अनिल दीक्षित, पर्यावरणप्रेमी अरुण पवार, शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक- अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण जागृतीचे पुणे विभाग अध्यक्ष विकास कुचेकर, पिंपरी-चिंचवड विभाग अध्यक्ष अण्णा जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती.

वृक्षाचे विधिवत पूजन करण्यात आले. झाडाच्या बुंध्याजवळ लेंडीखत टाकण्यात आले. ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी यांनी सादर केलेली वृक्षप्रार्थना आणि ह.भ.प. अशोक महाराज गोरे यांनी संत तुकाराममहाराज यांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या अभंगगायनाने कविसंमेलनाचा प्रारंभ करण्यात आला.

झाडाच्या फांद्याफांद्यांवर अन् बुंध्यावर बसलेले कवी हेच खरे तर या कवी संमेलनाचे वेगळेपण होते. साहित्यविश्वातील पहिला अद्भुत प्रयोग करून पर्यावरणविषयी लक्षवेधी (Pimple Gurav) जनजागृती या कविसंमेलनातून करण्यात आली.

Chinchwad : वाल्हेकरवाडी येथे ओढ्याच्या कडेला सापडले स्त्री जातीचे अर्भक

नंदकुमार मुरडे, फुलवती जगताप, सुभाष चटणे, राधाबाई वाघमारे, आय. के. शेख, संगीता झिंजुरके, डॉ. पी. एस. आगरवाल, विजया नागटिळक, आत्माराम हारे, सुमन दुबे, बाबू डिसोजा, मधुश्री ओव्हाळ, भरत गालफाडे, डॉ. श्रीनिवास साळुंखे, सीमा गांधी, विवेक कुलकर्णी, उमा मोटेगावकर, शंकर आथरे, जयश्री गुमास्ते, अशोक कोठारी, मयूरेश देशपांडे, अरुण कांबळे, पीतांबर लोहार, अनिल नाटेकर, आनंद मुळुक, नारायण कुंभार, योगिता कोठेकर या कवींनी निसर्ग आणि पर्यावरण या विषयावरील वैविध्यपूर्ण कवितांचे सादरीकरण केले.

या निमित्ताने दोन्ही संस्थांच्या वतीने परिसराची स्वच्छता करण्यात आली. झाडाच्या बुंध्याला काव अन् चुना लावून झाडाची प्रतिकारशक्ती वाढविण्यात आली. “वाढत्या वायूप्रदूषणात विनामूल्य प्राणवायू केवळ वृक्षांकडूनच मिळत असल्याने वृक्षारोपण अन् संवर्धन हे आपले आद्यकर्तव्य मानले पाहिजे!” असे आवाहन तानाजी एकोंडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून केले.

मुरलीधर दळवी, शरद काणेकर, प्रकाश घोरपडे, संगीता जोगदंड, मीना करंजावणे, नंदकुमार कांबळे, माधुरी डिसोजा यांनी संयोजनात सहकार्य केले. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शामराव सरकाळे यांनी आभार मानले. वृक्षभारुडाचे सामुदायिक गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.