Pune Crime News : चिंचवडच्या तरुणाला प्रेयसीसोबत एकांतात फिरायला जाणे पडले महागात

चोरट्यांनी मारहाण करून लुबाडले

एमपीसी न्यूज : पुण्याच्या सुस परिसरातील एका टेकडीवर प्रेयसीसह फिरायला जाणे एका तरुणाला भलतेच महागात पडले. या युगुलाला तीन चोरट्यांनी एकांतात गाठून ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील एक लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. पिंपरी-चिंचवड मध्ये राहणाऱ्या एका 34 वर्षीय तरुणाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा चिंचवड परिसरात राहतो. शुक्रवारी सायंकाळी तो मैत्रिणीसह सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेला होता. त्यावेळी त्या ठिकाणी तीन अज्ञात तरुण आले. त्यांनी या दोघांना हाताने व लाकडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. तर सोबत असलेल्या मैत्रिणीच्या कानाखाली प्रत्येकाने जोरात चापट मारली.

त्यानंतर आरोपींनी दोघांनाही ठार मारण्याची धमकी देत मैत्रिणी कडील 25 ग्रॅम वजनाचे 90 हजार रुपयांचे दागिने, दोन मोबाईल, चांदीची अंगठी, रोख 2300 रुपये आणि इतर कागदपत्र असा एकूण एक लाख सात हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चतु:शृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळी करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.