Chikhali : रुपीनगर परिसरात सुमारे वीस जणांना चावला पिसाळलेला कुत्रा

एमपीसी न्यूज – रुपीनगर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने सुमारे वीस जणांना चावा घेतला. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना आज (रविवारी, दि. 24) दुपारी रुपीनगर परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रुपीनगर परिसरात मागील चार दिवसांपासून एक पिसाळलेला कुत्रा फिरत आहे. चार दिवसांपूर्वी हा कुत्रा एका लहान मुलीला चावला. त्यानंतर पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी रुपीनगर परिसरात उच्छाद मांडला. सुमारे वीस जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे.

लहान मुले घराच्या अंगणात खेळत असताना त्यांच्यावर झडप घालून कुत्र्याने चावा घेतला आहे. सात जखमींना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पशु वैद्यकीय अधिकारी अरुण दगडे म्हणाले, “पिसाळलेल्या कुत्र्याची माहिती मिळाली आहे. त्याला पकडण्याची कारवाई सुरू आहे. लवकरच कुत्रा पकडला जाईल.”

स्थानिक नागरिक सचिन सोळंखे म्हणाले, “पिसाळलेला कुत्रा मागील एक आठवड्यापासून रुपीनगर परिसरात फिरत आहे. चार दिवसांपूर्वी तो एका लहान मुलीला चावला आहे. त्याच्यावर प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही. माझा मुलगा वीर (वय 3) हा दुपारी घराच्या दारात खेळत होता. अचानक पिसाळलेला कुत्रा आला आणि वीरचा चावा घेतला.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.