Maval : लोकांमध्ये असणारा आणि लोकांसाठी झटणारा खासदार ही बारणे यांची ओळख – आदेश बांदेकर

पिंपरी-चिंचवड शहरात दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत महायुतीची भव्य प्रचार रॅली

एमपीसी न्यूज- लोकांसाठी धावून जाणारा, लोकांमध्ये असणारा खासदार म्हणून बारणे यांची ओळख आहे. बारणे यांनी लोकसभेत विचारलेले प्रश्न आणि केलेले काम खूप मोठे आहे, असे मत शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांनी व्यक्त केले.

मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) मतदान होणार आहे. प्रचार आज (शनिवारी) संपणार आहे. शिवसेना – भाजप – आरपीआय – रासप – शिवसंग्राम – रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी बांदेकर बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर, आमदार लक्ष्मण जगताप, दौंडचे आमदार राहुल कुल, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महायुतीचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या रॅलीमध्ये बारणे यांचे पुत्र विश्वजित बारणे यांनीही सहभाग घेतला.

महायुतीच्या रॅलीची सुरुवात देहूरोड मधील विकासनगर येथून झाली. मुकाई चौक, कातळेनगर मार्गे समीर लॉन्स, मळेकर वस्ती, रावेत गावठाण, वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर, शिवनगरी, गिरीराज, प्रेमलोक पार्क, एसकेएफ कॉलनी, पवना नगर, चिंचवड गावठाण, तानाजी नगर, केशव नगर, काळेवाडी, रहाटणी, वाकड, गणेश नगर, लक्ष्मण नगर, अशोका सोसायटी, थेरगाव गावठाण या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली.

मावळ लोकसभे प्रचाराच्या तोफा आज (शनिवारी) थंडावणार आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने संपूर्ण शहरात फिरून प्रचाराची शेवटची प्रचार फेरी काढण्यात आली. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बारणे यांनी मागील पाच वर्षात केलेले भरीव काम जनतेपर्यंत पोहोचवले आहे. शेवटच्या प्रचारफेरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा महायुतीला मतदान करून देशहिताला मदत करण्याचे आवाहन महायुतीकडून करण्यात येत आहे.

आदेश बांदेकर म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना एक शिकवण दिली आहे. जे शक्य असेल तर बोला आणि जे बोलाल ते पूर्ण करा. या शिकवणीनुसार बारणे यांनी काम केले आहे. बारणे यांनी केलेले काम मावळच्या जनतेने पाहिले आहे. पुन्हा एकदा घराघरातील प्रतिनिधित्व करण्यासाठी मावळची जनता बारणे यांना मतांचा आशीर्वाद देऊन लोकसभेत पाठवेल, असा विश्वास देखील बांदेकर यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.