Akurdi News: काँग्रेसला त्यागाचा, बलिदानाचा इतिहास – उल्हास पवार

‘परिवर्तन 2022’ महिला प्रशिक्षण शिबीराचा समारोप

एमपीसी न्यूज –  स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसला  पक्षाला त्यागाचा बलिदानाचा इतिहास आहे. देशाची अखंडता, समता अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसने अनेक धाडसी निर्णय घेतले. काँग्रेसचे दोन पंतप्रधान दहशतवादी हल्ल्यात बळी पडले. स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी जीवाची पर्वा न करता देशहिताला प्राधान्य दिले. आता मात्र छप्पन्न इंच छातीची वल्गना करणारे शेतक-यांनी रस्ता अडवला म्हणून घाबरुन दिल्लीमध्ये परतले आणि ‘पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना सांगा मी जीवंत परत आलो’ अशी प्रतिक्रिया देतात हे कशाचे द्योतक आहे? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी उपस्थित केला.

आकुर्डी, प्राधिकरण येथिल केरळ भवन येथे आयोजित केलेल्या ‘परिवर्तन 2022’ या महिला प्रशिक्षण शिबीराच्या समारोप प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा महाराष्ट्राच्या प्रभारी सोनल पटेल, शहराध्यक्ष कैलास कदम, महिला शहराध्यक्षा सायली नढे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी नगरसेविका निर्मला कदम, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, छायाताई देसले, डॉ. मनिषा गरुड, स्वाती शिंदे, भारती घाग, सुप्रिया पोहारे, सोनू दमवाणी, राजश्री बनसोडे, राणी राठोड, रचना गायकवाड, सुप्रिया मलशेट्टी, प्रियांका कदम, दिपाली भालेकर, अनिता डोळस, वैशाली शिंदे, प्राजक्ता गावडे, अनिता अधिकारी, निर्मला खैरे तसेच मार्गदर्शक यशराज पारखी आणि ऋत्विक जोशी आदींसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. समारोप प्रसंगी सहभागी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले.

पवार म्हणाले की, इंदिराजींना सुरक्षा रक्षकांकडून धोका आहे असे सांगितले असतानाही त्यावेळी सुरक्षा अधिका-यांना त्या म्हणाल्या की, मी महात्मा गांधींची अनुयायी आहे. पंडित जवाहरलाल यांची कन्या आहे. देशाच्या घटनेवर आणि धर्म निरपक्षतेवर माझा विश्वास आहे. मी माझ्या सुरक्षा रक्षकांवर संशय व्यक्त करणे योग्य नाही. देशाची अखंडता आणि धर्म निरपेक्षता अबाधित ठेवण्यासाठी माझे प्राण गेले तरी चालेल अशा ध्यैर्याने त्या प्रसंगाला सामोरे गेल्या आणि कालांतराने त्यांची हत्या झाली.

राजीव गांधी यांनाही सुरक्षा अधिका-यांनी जाऊ नका असे सांगितले होते. परंतू त्यावेळी राजीव गांधी यांनी प्राणापेक्षा, कर्तव्याला महत्व दिले आणि ते तामिळनाडू मधिल सभेला गेले आणि त्यांची त्या ठिकाणी हत्या झाली. काँग्रेस विरोधी पक्षांचा, विरोधी विचारांचा देखिल आदर करणारा पक्ष आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना युनोच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधी म्हणून भाजपाचे तत्कालीन खासदार अटबिहारी वाजपेयी यांना पाठविले होते. आताचे केंद्रातील भाजपाचे सरकार विरोधी पक्षांच्या, विरोधी विचारांच्या व्यक्ती, संस्था, संघटनांच्या मागे, माध्यमांच्या मागे ईडी आणि आयटीचा ससेमिरा लावतात हि एक दमनशाही, हुकूमशाही आहे. छप्पन्न इंच छातीच्या नेत्यांना हे शोभत नाही. आगामी काळात देशातील सूज्ञ नागरीक त्यांना घरचा रस्ता दाखवतील असेही उल्हास पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.