Alandi : घरफोडीप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – प्लॉटिंग केलेल्या जागेतील दोन पत्र्याचे शेड फोडून 42 हजार 700 रुपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कमळजाई वस्ती, मरकळ येथे 29 मार्च रोजी घडली.

रमेश दगडू गोडसे, अतुल रमेश गोडसे, किरण रमेश गोडसे, अनिकेत रामदास गोडसे, निखिल सुनील लोखंडे, त्यांच्या घरातील दोन महिला आणि अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रवी लक्ष्मण लांडगे (वय 35, रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लांडगे यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी मरकळ येथे केलेल्या प्लॉटिंगमध्ये पत्र्याचे शेड बांधले आहे. तसेच त्यांनी देविशंकर मिश्रा यांना विकलेल्या एका प्लॉटमध्ये देखील पत्र्याचे शेड बांधले आहे. आरोपींनी दोन्ही शेड गॅस कटर आणि जेसीबीच्या साहाय्याने फोडून घरगुती वापराचे 42 हजार 700 रुपयांचे साहित्य घरफोडी करून ट्रॅक्टरमध्ये भरून नेले. तसेच प्लॉटिंगमधील सिमेंट पोलचे कंपाउंड तोडून नुकसान केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.