Pune : अमृता फडणवीस राजकारणात येणार नाहीत – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – अमृता फडणवीस त्यांचा स्वतः निर्णय घेतात. त्या राजकारणात येणार नाहीत. याचा आपल्याला विश्वास आहे. त्या ज्यावेळी एखादी भूमिका मांडतात. त्यावेळी त्यांच्यावर खालच्या दर्जावर ट्रोल केले जाते, अशी स्पष्ट कबुली माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आम्ही विधानसभा निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले नव्हते. मात्र, शिवसेना – राष्ट्रवादी – काँगेसने 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी ते पाळले नाही. म्हणून मी तोंडाला पाने पुसली, असे म्हणत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. राज्यात आता जे काही करायचे ते ‘डंके की चोट पर’ करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सोमवारी सायंकाळी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

मागील 5 वर्षांत जनतेचा विश्वास मिळविला. पारिवारिक जीवनाचा आनंद घेता आला नाही. मुलीला सिनेमा, हॉटेल, उद्यानांत घेऊन जाऊ शकलो नाही. मित्रांना वेळ देता आला नाही. सहकारी मित्रांचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दिलखुलास संवाद फडणवीस यांनी साधला.

नागपूर अधिवेशनात केवळ औपचारिकता पार पडली. नवीन सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करायला का वेळ लागतो, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. देशात नागरिकत्व सुधारणा कायदावरून जो वाद चालला आहे, हा राजकीय पद्धतीने सुरू आहे. मुस्लीम समाजाचे माथी भडकवन्याचे काम सुरू आहे. नागरिकत्व घेण्याचा नव्हे तर देण्याचा कायदा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनीही त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावरही चुकीचा प्रचार सुरू आहे. या कायद्याच्या समर्थनार्थही लोक रस्त्यावर येत आहेत. सर्वांनी शांततेत आंदोलने करावी, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

देशात ज्या राज्यांनी कर्जमाफी केली, त्यांनी आपल्या भरवशावर केली. 7/12 कोरा करण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते, त्यांनी ते पाळावे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती इतर राज्यांच्या तुलनेत चांगली आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे. शरद पवार यांचे पोलिसांची चौकशी करण्या संदर्भातील वक्तव्य मनोबल खच्चीकरण करणारे आहे. कॅगचा आरोप हास्यास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी निक्षून सांगितले. तर, कमी जागांमुळे राज्य गमवावे लागत आहे. त्याचा विचार भाजपच्या बैठकीत करावा लागणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.