Pimpri: मोरवाडीतील आनंदधाम स्मशानभूमीची दुरावस्था

एमपीसी न्यूज – पिंपरी, मोरवाडी येथील  आनंदधाम स्मशानभूमीची अतिशय दुरावस्था झाली आहे. स्मशानभूमीमध्ये वायुप्रदूषण यंत्रणा अस्तित्वात नाही. स्मशानभूमीतील दहनशेड, निवाराशेड व स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे महापालिकेने स्मशानभुमीची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी बी. आर. आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी केली आहे. 

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कदम यांनी म्हटले आहे की, स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. स्मशानभूमीत अपु-या सुविधा आहेत. स्मशानभूमीतील दहनशेड, निवाराशेड व स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. स्मशानभूमीतील दहनशेडची चाळण झाली आहे. पत्र्यांना मोठमोठी छिद्र पडली आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी गळते. शेडवरील पत्रे पूर्णपणे कुजले आहेत. पाऊस सुरू असताना अंत्यविधी करण्याची वेळ आली, तर मृताच्या नातेवाइकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. विद्युतदाहिनी व विद्युत जाळीची व्यवस्था करण्यात आली नाही.

भटकी कुत्री व डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा त्रास पादचा-यांना सहन करावा लागतो. येथील कच-याची विल्हेवाट लावून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. स्मशानभूमीमध्येही मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे. आवश्यक सोयी-सुविधांची वानवा असल्यामुळे स्मशानभूमीमध्ये नागरिकांची गैरसोयच जास्त होते. वेळेत साफसफाई होत नसल्यामुळे स्मशानभूमीची दुरावस्था होत आहे. येथे नियमित सफाई कामगार नेमण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची दुरवस्था होत आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.