Pune :  पालिकेत नव्याने समाविष्ट ११ गावांतील अंतिम प्रभाग रचना जाहीर 

एमपीसी न्यूज : महापालिका हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या निवडणुकींसाठी अंतिम प्रभाग रचना महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोणताही बदल झाला नसल्याचे महापालिका निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रभाग रचनेवर २१ हरकती आणि सूचना घेण्यात आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने नगरसेवकांची संख्या वाढवावी, प्रभागांची संख्या ३ करावी, दैनंदिन कामकाजासाठी प्रभाग हद्दीनुसार क्षेत्रीय कार्यालायास जोडावा अशा प्रकारच्या हरकती उपस्थित केल्या होत्या मात्र निकषांनुसार हे शक्य नसल्याने प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे. 

संबंधित ११ गावांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरु केली असून या गावांसाठी एकच प्रभाग वाढणार आहे. त्यात केवळ २ नगरसेवक असणार आहेत. या दोन्ही जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. त्यात १ जागा पुरुषासाठी तर १ जागा महिलेसाठी राखीव असणार आहे. दरम्यान, ११ गावांमध्ये लोहगाव आणि फुरसुंगी या गावांची लोकसंख्या अधिक असल्याने याला फुरसुंगी- लोहगाव असे या प्रभागाला नाव देण्यात आले आहे. या प्रभागाची लोकसंख्या २ लाख ३९ हजार इतकी असून क्षेत्रफळ आणि लोकसंख्या  विचारात घेता हा महापालिकेतील सर्वात मोठा प्रभाग ठरणार आहे. तरीदेखील या गावांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी फक्त दोनच नगरसेवक असल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

दरम्यान, ही अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार असून त्यानंतर आयोगाकडून या प्रभागासाठीचे निवडणूक वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.