Pune news: पुणे येथील रोजगार मेळाव्यात रेल्वेत नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली नियुक्तीपत्रे

एमपीसी न्युज : केंद्र सरकार येत्या एका वर्षात देशात 10 लाख नवीन नोकऱ्या देणार आहे, याच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलांद्वारे सुरू करण्यात आला आणि त्यांनी देशातील विविध केंद्रीय मंत्रालयांमध्ये नवनियुक्त करण्यात आलेल्या देशातील 75000 तरुण कर्मचाऱ्यांना 22 ऑक्टोबर रोजी देशभरातील विविध शहरांमध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळ्यांमध्ये ऑनलाइन डिजिटल पद्धतीने नियुक्तीपत्रे सुपूर्द केली.

याच अनुषंगाने पुणे स्थित यशदा येथे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री श्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमात त्यांच्या करकमलांनी केंद्र सरकारच्या विभिन्न विभागांमध्ये निवड झालेल्या युवकांना रोजगार संबंधित नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाचे उच्च व तांत्रिक शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कामकाज मंत्री व पुण्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रकाश जावडेकर आणि आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.

यावेळी पुणे रेल्वे विभागातील 26 नवनियुक्त कर्मचाऱ्यांना देखील नियुक्तीपत्रे देण्यात आली. या नवनियुक्त कर्मचाऱ्यांची निवड रेलवे भर्ती बोर्ड आणि रेलवे रिक्रूटमेंट सेल द्वारे योग्य प्रक्रियेने करण्यात आली आहे.यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे रेल्वे विभागात सेवा सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय कार्मिक अधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांनी केले. यावेळी वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक डॉ. राहुल पाटील, सहायक कार्मिक अधिकारी मच्छिंद्रनाथ, सुनील ठाकूर, पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांच्यासह मुख्य कल्याण निरीक्षक राकेश कुमार, सुप्रिया सावंत, रवींद्र लवळे आणि कार्यालय अधीक्षक गणेश शेट्टी सहित मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.