Antarang Diwali Ank : अंतरंग दिवाळी अंक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा – मंदार महाराज देव

एमपीसी न्यूज – अंतरंग दिवाळी अंक हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा आहे, असे गौरवोद्गार चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी काढले. 

एमपीसी न्यूजच्या पिंपरी-चिंचवड अंतरंग दिवाळी अंकाचे प्रकाशन चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांच्या कन्या सई मंदार देव तसेच शिरीष पडवळ, एमपीसी न्यूजचे मुख्य संपादक विवेक इनामदार, कार्यकारी संपादक हृषीकेश तपशाळकर, सहयोगी संपादक अनिल कातळे, निमंत्रित संपादक श्रीकांत चौगुले, मुख्य वार्ताहर गणेश यादव, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे, कार्यालयीन सहायक सोनाली चव्हाण आदी उपस्थित होते.

एमपीसी न्यूजच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेला हा 11 वा दिवाळी अंक आहे. या अंकात ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केशव साठ्ये यांनी लिहिलेला नियती नाट्याचे निरुपणकार हा विशेष लेख, तरुणाईला गडकिल्ल्यांची वाट दाखविणारे दुर्गमहर्षी प्रमोदभाऊ मांडे यांच्यावरील अरुण बोऱ्हाडे यांचा लेख, मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या जीवनप्रवासावरील प्रा. तुकाराम पाटील यांचा विशेष लेख, प्रतिभावंत दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांच्यावरील प्रदीप गांधलीकर यांचा लेख, कवी कुंजविहारी यांच्यावरील अमेल गुप्ते यांचा लेख, वामनदादा कर्डक यांच्यावरील आनंद देशमुख यांचा लेख तसेच संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली अर्पण करणारा श्रीकांत चौगुले यांचा लेख ही या दिवाळी अंकाची खास वैशिष्टे आहेत.

याखेरीज प्रा. सुरेखा कटारिया यांची ‘शब्दांचा तोल’ ही समकालीन मराठी जैन कथा, ‘शिवा’ ही प्रा. राजेंद्र सोनावणे यांची कथा, ‘अनुत्तरीत’ ही उमेश तुपे यांची गूढकथा, फुला ही गौरी भालचंद्र यांची कथा, गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी मांडलेली एका लावणीची जन्मकथा, दिवंगत माजी शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या कन्येने लिहिलेला ‘माझे बाबा’, आदर्श गावाची गोष्ट मांडणारी इंदी ही फुलवती जगताप यांची कथा, फाळणी व दंगलीमधून मिळालेला धडा हा एका 86 वर्षीय आजींनी सांगितलेल्या आठवणींवरील लेख, बालक, बाहुली आणि बाहुली नाट्य हा एम. के. गोंधळी यांचा वेगळ्या विषयावरील लेखाचा या दिवाळी अंकात समावेश आहे.

ज्ञानदेव मानवतकर, भूषण सहदेव तांबे, आशिष निनगुरकर, उज्ज्वला ढमढेरे, राजन लाखे, किरण शिवहर डोंगरदिवे, राज अहेरराव, शाश्वत देशमुख, पुरुषोत्तम सदाफुले, आनंद देशमुख, वि. दा. पिंगळे, वंदना इन्नानी यांच्या कवितांनी अंकाची रंगत वाढवली आहे.

दरवर्षीप्रमाणे ज्योतिषभास्कर उमेश स्वामी यांनी लिहिलेले वार्षिक राशीभविष्यही आपल्याला या दिवाळी अंकात वाचायला मिळेल.

अंतरंग दिवाळी अंकाची प्रत 100 रुपयांना उपलब्ध असून एमपीसी न्यूजच्या चिंचवड व पिंपरी कार्यालयांमध्ये ती गुरुवार (27 ऑक्टोबर) पासून उपलब्ध असेल. आपली प्रत राखून ठेवण्यासाठी 9011050002 या व्हॉट्सअॅप नंबरवर आपले नाव व पूर्ण पत्ता असलेला मेसेज पाठवावा, असे आवाहन विवेक इनामदार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.