Reaction On Karanjvihire Murder Case: नराधम एका रात्रीत जन्माला येतात का?

article on karanjvihire murder case या प्रश्नाचे मूळ आहे. कुठे असे जर विचाराल तर ते आपण सगळेच या ना त्या कारणाने ज्याचे सतत गोडवे गातो. आपल्या वागण्यातून सतत त्याला खतपाणी घालत असतो

एमपीसी न्यूज- खेड तालुक्यातील करंजविहीरे गावातील एका 17 वर्षाच्या निष्पाप मुलीच्या निर्घृण हत्येविषयीच्या बातमीने मन पुन्हा एकदा सुन्न झाले. पुन्हा तोच आक्रोश, त्याच मेणबत्या, तेच मोर्चे आणि नंतर स्मशान शांतता. मुलींवर स्त्रियांवर होणारी ही अशी अमानुष हिंसा थांबली पाहिजे असे सर्वांनाच वाटते. पण या विषयात केवळ वाटून फायदा नाही तर प्रत्यक्षात प्रत्येकाने कृतीतून सातत्याने प्रयन्त करणे गरजेचे आहे. मुली बायकांवर होणारी ही अमानुष हिंसा जर थांबवायची असेल तर फक्त प्रश्नाच्या वरवरच्या मुद्यांवर काम करून चालणार नाही तर प्रश्नाच्या मुळावर घाव घातले पाहिजे आणि ते सुद्धा सतत.

या प्रश्नाचे मूळ आहे. कुठे असे जर विचाराल तर ते आपण सगळेच या ना त्या कारणाने ज्याचे सतत गोडवे गातो. आपल्या वागण्यातून सतत त्याला खतपाणी घालत असतो, त्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आहे. ज्याला तुम्ही आज नराधम म्हणता तो एका रात्रीत तयार होतो का? हे नराधम आपल्याच घरात असतात आणि आपणच त्यांचे जिभेचे, शरीराचे, हौशी मौजीचे चोचले करून रोज त्याची भूक वाढविण्यासाठी खतपाणी घालत असतो.

एखाद्या स्त्रीला / मुलीला अशी आपण एखादा किडा पायाखाली रगडावा तशी केव्हाही रगडू शकतो, संपवू शकतो हे मुलगे कुठे शिकतात? हे शिक्षण त्यांचे रितसर घरात आणि समाजात होत असते. ही काही सर्वसामान्य पण पुरुषी मानसिकता तयार करणारी वाक्यं आपण सर्वच घरात सहजच ऐकतो. तो लहान आहे त्याला दे, किंवा तो मोठा आहे त्याला दे, तो दादा आहे. त्याला दे, तू ताई आहेस त्याला दे, तू शहाणी आहेस त्याला दे, तो ऐकणार नाही, तो आदळ आपट करेल, तो रडेल, पोरीसारखा काय रडतोस? तू काय मुलगी आहेस का मुळुमुळु रडायला, तू काय मुलगी आहेस का मार खाऊन घ्यायला ही साधीसाधी वाक्य मुलग्यांना रोज हेच शिक्षण देत असतात की मी महत्वाचा आहे, माझ्या पुढे हिची किंमत शून्य आहे. मी मार खाणारा नाही मारणारा असलो पाहिजे, सतत मी पुरुष आहे हे सिद्ध केलं पाहिजे.

घरात जेव्हा मुलगे पुरुषांकडून लहान मोठ्या कारणाने घरातील बाईला, मुलीला शिव्या देताना ऐकतात. स्त्रियांना मार खाताना बघतात, कोणत्याही गोष्टीत घरातील मुलाला सर्व गोष्टीत प्राधान्य मिळते. हे पाहतात तेव्हा पासुनच ही मानसिकता तयार व्हायला सुरुवात होते की, बाईने काही नाही ऐकलं, आपल्यापेक्षा वरचढ वागली, आपला अपमान केला तर तिला आपण अशी हवीतशी चुरगाळून फेकून देऊ शकतो.

या अशा विकृत वागण्यातून काय सिद्ध करायचं असतं यांना ? यांना हे सिद्ध करायचं असतं की जर कुणीही स्त्रियांनी/ मुलींनी अन्यायाविरोधात आवाज उठवला तर त्यांच्या सर्वांची स्थिती ही अशीच केली जाईल म्हणून गप्प बसा, जे होत आहे ते सहन करा, कशाच्याच विरोधातच काहीही बोलू नका. हीच दहशत निर्माण करायची असते या कृत्यातून.

या घटनेनंत जर काही शिकायचे असेल तर ते हे शिकले पाहिजे की आपल्या घरातील मुलगा फक्त पुरुषी न बनता एक संवेदनशील माणूस कसा बनेल, जो स्त्रियांना देखील माणूस म्हणून जगायला संधी देईल. या निष्पाप मुलीनंतर कोणत्याही मुलीचा बळी आपल्या घरातील मुलाने घेऊ नये यासाठी सातत्याने जागरुक राहणे त्यासाठी आपल्या घरातील, आजूबाजूच्या मुलग्यांसोबत काम करणे हाच त्या निष्पाप मुलीला मिळालेला खरा न्याय असेल असे मला वाटते.

आपण पुरुष घडविण्यापेक्षा जर माणसं घडविली तर न्याय व्यवस्थमध्येसुद्धा बदल घडायला वेळ लागणार नाही.

या घटनेने घाबरून मुलींचे शिक्षण, नोकरी थांबविणे त्यांना लग्नाच्या बंधनात लवकर अडकवून आपण त्यातुन मोकळे होणे या अशा घटना म्हणजे एका अर्थाने या नराधमांच्या विकृत मनोवृत्तीचाच विजय आहे या मानसिकतेचा विजय होता काम नये.

– प्रभा विलास
वर्क फॉर इक्वालिटी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.