Sangvi Crime News : जुनी सांगवी येथे अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Sangvi Crime News : जुनी सांगवी येथे अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – जुनी सांगवीमधील लक्ष्मीनगर येथे असलेले अॅक्सीस बँकेचे एटीएम एका चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. शनिवारी (दि. 14) पहाटे सोमाटणे येथे देखील अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे.

पोलीस नाईक स्वप्नील विश्वनाथ शिंदे यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर, जुनी सांगवी येथे अॅक्सीस बँकेचे एटीएम आहे. सोमवारी (दि. 16) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी चोरट्याने एटीएममध्ये प्रवेश केला. मशीनचे स्क्रीन, पत्र्याचे कव्हर, कॅश वेच्या खालील डायलरच्या बाहेरील आवरणाचा पत्रा उचकटला. त्यानंतर डायलरच्या एका बाजूला ठोसे मारून डायलर तोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम सेंटरच्या मुख्य दरवाजाची काच व त्याबाजूची काच फोडून नुकसान केले. मात्र, आतील मुख्य दरवाजा उचकटता न आल्याने चोरट्याला मशीनमधून रोकड चोरता आली नाही. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

सोमाटणे येथे अशाच पद्धतीने अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र चोरट्याला तिथल्या एटीएम मधून देखील रोकड काढता आली नाही. मागील तीन दिवसांतील ही दुसरी घटना असून या दोन्ही घटनांमध्ये एकाच बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.