Nigdi : मॉडर्न स्कूलच्या गाईड पथकाकडून जनजागृती

एमपीसी न्यूज – यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमधील जिजामाता गाईड पथकाच्या मुलींनी यमुनानगर परिसरात जनजागृती फेरी काढली. यावेळी गाईड पथकाच्या गणवेशातील मुली, हातात ‘पाण्याविना नाही प्राण’ ‘श्वासाइतका
पाण्याचा आधार’ ‘साक्षर भारत समृद्ध भारत’ ‘जल है तो कल है’ असे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. जिजामाता गाईड पथकाच्या हिवाळी शिबिराच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली आहे.

या शिबिराचेे उद्घाटन पुणे भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक उषा हिरवाळे, तर स्काऊट गाईडचे सहाय्यक जिल्हा आयुक्त विजय जोरी, नाथा मानकर, संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार, मॉडर्नचे प्राचार्य सतीश गवळी, राजीव कुटे, मीनाक्षी मेरूकर, आशा कुंजीर, सुजाता ठोंबरे, शिवाजी अंबिके यांच्या हस्ते स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेचे
पूजन करण्यात आले आहे.

शिबिराच्या पहिल्या सत्रात विजय जोरी यांनी स्काऊट गाईडच्या उद्देशाबाबत मार्गदर्शन केले. तसेच दोरीच्या विविध वापरासाठी दोरीच्या अनेक गाठीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तर आपत्कालीन संकटात कोणते प्रथमोपचार करू
शकतो याची माहिती दिली. यावेळी मुलांनी स्वतः अल्पोपहार तयार करण्याचा आनंद लुटला आहे.

दुसऱ्या सत्रात मुलींनी जलशुद्धीकरण आणि साक्षरता या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले. तर सायंकाळी शेकोटीच्या कार्यक्रमात समाजप्रबोधन आणि मनोरंजनपर विविध नाटिका आणि गाणी सादर केली. या शिबिरासाठी सुजाता ठोंबरे, आशा कुंजीर यांनी संयोजन केले. या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.