Ayodhya Live : शंखनादात बाळ रामराय झाले विराजमान; रामाच्या लोभस रूपाने भारतीयांचे डोळे पाणावले

एमपीसी न्यूज : अनेक वर्षांच्या संघर्षानंतर (Ayodhya Live ) आज श्री राम आपल्या नगरीत आपल्या मूळ स्थानी स्थापन झाले. सर्वांना ज्या क्षणांची ओढ लागली होती तो क्षण पूर्ण झाला असून रामरायांची अगदी वेळेत मुहूर्तवेळी स्थापना झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम यांची प्राणप्रतिष्ठापणा झाली असून पुढील पूजा विधी सुरू आहे. आज लाखों भारतीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. 

पीएम मोदी भगवान श्री रामासाठी छत्री आणि कपडे घेऊन गर्भगृहात पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य द्वारातून पाच मंडप पार करून प्रवेश केला.
अयोध्येतील राम मंदिरात अभिषेकासाठी विधी सुरू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी पूजा केली. पंतप्रधान मोदींनी स्वस्ति वचन आणि गणपती पूजनाने विधींना सुरुवात केली.

गाभार्यात केवळ चार जणांनाच प्रवेश असणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि  उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची उपस्थिती असणार आहे.

भावनिक क्षण – पंतप्रधान मोदी

विधी सुरू करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. अयोध्या धाममध्ये श्री रामलल्लाच्या जीवनाच्या अभिषेकचा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग होणे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. जय सिया राम!


या विधी करणार पंतप्रधान –

पंतप्रधान मोदी श्री रामलल्ला यांच्या डोळ्यांवरील पट्टी काढणार आहेत.
पीएम भगवान रामाच्या डोळ्यात काजळ लावणार.
या नंतर ते देवाला सोन्याची वस्त्रे परिधान करतील.
मुख्य पूजेनंतर रामरायांना 56 भोग अर्पण केले जातील.
मुख्य पूजा 1 मिनिट 24 सेकंदाच्या शुभ मुहूर्तावर पूर्ण होईल.
प्राणप्रतिष्ठेची मुख्य पूजा अभिजीत मुहूर्तावर होईल.
इंद्र योग, मृगाशिरा नक्षत्र, मेष लग्न, वृश्चिक नवमशामध्ये पूजा


संपूर्ण अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदी दक्षिणेतील अनेक मंदिरांमध्ये पूजा करत होते. अयोध्येत पोहोचल्यानंतर पीएम मोदींनी एक व्हिडिओही बनवला असून तो शेअर केला आहे.


काही वेळात पंतप्रधान मोदी राम मंदिरात शुभ वेळ 12:29:8 सेकंद ते 12:30:32 सेकंद अगदी 84 सेंकदांत श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा करतील.


या पवित्र क्षणी हेलिकॉप्टरच्या मार्फत पुष्पवृष्टी करण्यात आली असून हेलिकॉप्टरच्या मार्फत प्रदीक्षिणा देखील करण्यात आली. गायक सोंनू निगम, अनुराधा पौडवाल, शंकर माधवन यांच्या सुरेल गीतांनी हा कार्यक्रम मंत्रमुग्ध झाला आहे.


रणवीर कपूर, आलिया भट्ट, रजनीकांत, जॅकी श्रॉफ, चिरंजीवी, राम चरण, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, कतरिना कैफ, विकी कौशल, अनुपम खेर, कैलाश खेर, हेमा मालिनी, अभिनेत्री कंगना रणौत, अरुण गोविल, दीपिका राम चरणी प्रतिष्ठा सोहळयासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत.

राजकारण्यांमध्ये उमा भारती, एन. चंद्राबाबू नायडू आणि एचडी देवेगौडाही अयोध्येत पोहोचले. अनिल अंबानी, आकाश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, अनन्या बिर्ला या उद्योगपतींनीही आपली जागा घेतली आहे. सायना नेहवाल आणि सचिन तेंडुलकर हे देखील खेळाडू दाखल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.