Pune : पुण्यात पार पडला ‘बहुपेडी’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

एमपीसी न्यूज –  डॉ. गिरीश रांगणेकर (Pune) यांच्या पहिले पुस्तक बहुपेडी याचे रविवारी (दि. 23) पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्राहलय येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अभिराम भडकमकर, डॉ. समीरण वाळवेकर, मंगला गोडबोले, चं. प्र. देशपांडे तसेच ‘सुनिधी पब्लिशर्स’ अविनाश काळे उपस्थित होते.

प्रकाशन समारंभानंतर अनप्लगड म्युझिकचा देखील कार्यक्रम आयोजित केला होता. गायक – डॉ. गिरीश रांगणेकर, वादक  – सुभाष देशपांडे, सुशील शिरसाट, समीर पारसनीस, इरा रांगणेकर, निवेदन – प्राजक्ता श्रावणे हे सहभागी झाले होते. याबरोबरच जितेंद्र भुरूक, मकरंद पाटणकर, नरेंद्र डोळे, अजय राव आणि पिंपरी चिंचवड साहित्य परिषदेचे अध्यक्ष /कवि राजन लाखे या गायकांनी त्याला हजेरी लावली आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपणहून सहभागी होऊन कार्यक्रमाला चार चांद लावले.

अभिराम भडकमकर म्हणाले की, गिरीशला मी अनेक वर्ष ओळखतो. मात्र, पुस्तकातून एक वेगळाच गिरीश मला भेटला. पुस्तकातल्या एका लेखात सुनील नायर नावाच्या गिरीशच्या मित्राची आपल्याला ओळख होते. सुनीलने गिरीशला दृक-श्राव्य माध्यमाची गोडी लावली, वेगवेगळ्या तांत्रिक बाजू सांगितल्या. मात्र, स्वतः मध्यातूनच ही मैफिल सोडून निघून गेला.  55 व्या पानावर भेटलेला सुनील 212 पानांचं पुस्तक संपवलं तरी आपल्याला आतून अस्वस्थ करत असतो.

Maval : आंदर मावळ व नाणे मावळातील पाचशे आदिवासी महिलांना भाऊबीजेनिमित्त साड्यांचे वाटप

गिरीशच्या लिखाणातली ताकद पुस्तकातून आपल्यापर्यंत (Pune) नीट पोचते. हे पुस्तक आत्मकेंद्री नाही. हे आत्मनिष्ठ लिखाण आहे. जत्रेला गेलेलं मूल जसं उत्सुकतेने एकेका टप्प्यावर थांबतं, जे जे समोर दिसतं त्याचा टप्याटप्याने आनंद घेतं आणि पुढे जात राहतं तसं गिरीशचं जगणं आहे. मला असं वाटतं, की त्यांनं असंच रहावं. “परमेश्वरानं मला वरून न विचारता पाठवलं ना.. मग मीही त्याला कशाला बांधील नाही.. अमुक अमुक प्रकारे जगण्यासाठी”. मला वाटतं, ध्येयाच्या मागे अनेक जण असतात पण अशी विचारसरणी, असं जगणं विरळाच.

नाट्यप्रशिक्षण घेतल्यामुळे एक प्रकारची शारीरिक आणि मानसिक लवचिकता लाभते. गिरीशनं ‘नाट्यवेद’ सारखा नाट्य प्रशिक्षण अभ्यासक्रम केला असल्यामुळे त्याला ती लवचिकता मिळाली. त्यानं केलेल्या विविध क्षेत्रातल्या मुशाफिरीतून ती डोकावते. एनएसडीला असताना ज्येष्ठ रंगकर्मी बी. व्ही. कारंथ आम्हाला नेहमी म्हणायचे, की चांगलं नाटक किंवा वाईट नाटक असं काही नसतं. एखाद्या नाटकाला लोक गर्दी करतात, परीक्षण चांगलं येतं, मात्र त्यात काम करताना मजा येत नाही. याच्या उलट व्यवसाय करू न शकलेलं, समीक्षकांनी नाकारलेलं एखादं नाटक काम करताना मोठं समाधान देतं.

तेव्हा जे करताना मजा येते, ते नाटक महत्त्वाचं! ‘मजा आया ना’ हे महत्वाचं! त्यामुळे गिरीश आणखी काही वर्षांनी त्याच्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना जेव्हा स्वतःला प्रश्न विचारेल – ‘मजा आया ना?’ तर त्याचं उत्तर नक्कीच आतून “हा, मजा आया, बहोत मजा आया’ असंच असणार ह्याची मला खात्री आहे!

डॉ. समीरण वाळवेकर म्हणाले की, लेखक लिहितो (Pune) कशासाठी? जोपर्यंत तो पांढऱ्यावर काळं उतरवत नाही, तोपर्यंत त्याची अस्वस्थता त्याला स्वस्थ बसू देत नाही. माध्यमांमध्ये काम करत असताना टीव्हीवर सतत चेहरा असून देखील मनामध्ये ही भावना असायची की हे काही शाश्वत नाही, चिरकाल टिकणारं नाही. टिकणार काय तर ते मुद्रित माध्यम. पांढऱ्यावरचं काळं. मग ते किती लोकांनी वाचलं, किती आवृत्ती निघाल्या हे सारं गौण आहे. लेखक ना प्रकाशकासाठी लिहितो ना वाचकांसाठी लिहितो. तो स्वतःसाठी लिहितो आणि गिरीशनं हे काम अतिशय उत्तम प्रकारे केलं आहे. अतिशय उत्तम डॉक्युमेंटेशन! विविध प्रकारचं काम करताना मनःस्वास्थ्य टिकवण्यासाठी गिरीशला त्याचे छंद मदतीला येतात. गिरीशने इथून पुढचे सहा महिने फक्त एखाद्या सिनेमावर काम करावं आणि तो सिनेमा जगभरातल्या दहा मोठ्या महोत्सवांमध्ये दाखवला जावा. तसेच प्रकाशकांनी नव्या पुस्तकासाठी जो प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर विचार करावा आणि सूक्ष्मात जाऊन एखाद्या विषयाचा विचार विस्तार करणारं पुस्तक लिहावं अशा शुभेच्छा देतो.

Maval : आंदर मावळ व नाणे मावळातील पाचशे आदिवासी महिलांना भाऊबीजेनिमित्त साड्यांचे वाटप

चं. प्र. देशपांडे गिरीशनं व्यक्त-अव्यक्त मासिक काढलं. त्यामुळे आमची ओळख झाली. जे अंक निघाले ते दर्जेदार म्हणावेत असेच होते. त्यातला बाळ मोघेंचा ‘प्रकाश योजने’वरचा लेख समर नखातेंपासून अनेक नाट्यकर्मींना आवडला होता, त्याची चर्चा झाली होती. ‘बहुपेडी’ पुस्तक देखील फारच उत्तम झालेले आहे. मला मात्र पुस्तकाची वेगळीच काळजी आहे. त्याला बक्षीस द्यायचे झाल्यास ते कोणत्या वर्गवारीत बसवायचं हा मोठा पेच असणार आहे!

मंगला गोडबोले – पहिल्या पुस्तकाचा आनंद किती अपूर्व असतो हे मी 43 वर्षांपूर्वी अनुभवलं आहे. पूर्वी प्रकाशन समारंभ हा प्रकारच नव्हता. त्यामुळे माझ्या पुस्तकाचा पहिला प्रकाशन समारंभ माझं 30-32 वं पुस्तक आलं. रांगणेकर आमच्या क्षेत्रात आलेच आहेत तर त्यांची आणखी पुस्तके येवोत आणि ती टिकोत सुद्धा यासाठी शुभेच्छा देते.

अविनाश काळे – अतिशय वेगळं धाटणीचं पुस्तक आम्ही केलं आहे आणि ते करताना आम्हाला विलक्षण समाधान देखील मिळालं आहे. गिरीश रांगणेकर हे एक बहुआयामी, अनेक पैलू असलेलं व्यक्तिमत्व. समाज माध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे उथळ मानसिकता असलेले लोक आजूबाजूला वावरत असताना रांगणेकरांसारखा खोलात जाऊन विचार करणारा जिव्हाळ्याचा मित्र आम्हाला मिळाला. रांगणेकरांनी ह्या पुस्तकामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलेले आहे. ह्याच्या पुढे त्यांनी त्यातल्याच एका विषयावरती गंभीरपणे आणि खूप मोठं ऐवज असलेलं असं काही लिहावं. ते पुस्तक आपण इथून पुढच्या काळात नक्की प्रकाशित करू!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.