Pimpri: बालदिनानिमित्त सांगवी आणि भोसरीत पालिका भरविणार बालजत्रा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बालदिनानिमित्त 14 नोव्हेंबर 2018 रोजी सांगवी आणि भोसरीत बालजत्रा भरविण्यात येणार आहे. या जत्रेमध्ये लहान मुलांची खेळणी व विविध मनोरंजनाचे खेळ घेतले जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्ताला महिला व बालकल्याण समितीने आयत्यावेळी मान्यता दिली. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा आज (मंगळवारी) पार पडली. सभापती स्वीनल म्हेत्रे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

बालदिनानिमित्त 14 नोव्हेंबर 2018 रोजी सांगवीतील पी.डब्ल्यू डी मैदान आणि भोसरीतील गावजत्रा मैदानात बालजत्रा भरविण्यात येणार आहे. या जत्रेमध्ये लहान मुलांची खेळणी व विविध मनोरंजनाचे खेळ, तसेच खाऊ वाटप करावे. तसेच मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात याव्यात. याशिवाय पालकांसाठी मुलांचा आहार व आरोग्य या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान ठेवावे, असे याबाबतच्या ठरावात म्हटले आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला आहे.

तसेच  महापालिकेच्या बालवाडीतील मुलांना स्वच्छता कीट देण्याचा विषय देखील आयत्यावेळी मंजूर करण्यात आला. त्यासाठी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय नागरवस्ती विभागाकडील महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील बालवाड्यांच्या भिंती थ्रीजी पेंटिगद्वारे बोलक्या करण्यास मान्यता दिली. त्याचबरोबर महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढीचे काम अखिल भारतीय संस्थेला देण्यास मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.