मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Banglore-Pune Highway : अपघाताचा बनाव करून लुटणारे गजाआड, हिंजवडी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – बंगळुरू-मुंबई महामार्गावर (Banglore-Pune Highway) 11 ऑगस्ट रोजी रात्री एका दुचाकीस्वाराला धक्का लागल्याने एक व्यक्ती खाली पडला. त्याला लागले म्हणून त्याला मारहाण करत लुटण्यात आले होते. यात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, त्यांनी धक्का लागणे हे केवळ निमित्त केले असून त्याद्वारे ते नागरिकांना लुटत असल्याचे पोलिसांसमोर कबुल केले.

साहिल संजय साठे (वय 21 रा. मुळशी) व हर्षल सुनिल गोळे (वय 20 मुळशी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रकाश रस्तोगी यांनी तक्रार दिली होती.

Aditya Murder Case : लहान मुलांसाठी एक विशेष कायदा करण्याची गरज – विरोधीपक्ष नेते अजित पवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांना बातमी मिळाली की, दोघेजण अपघाताचा बनाव करून धमकी देत नागरिकांना लुटत आहेत. पोलीसांनी महामार्गावर (Banglore-Pune Highway) जात दोन संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याची विचारपूस केली असता त्यांनी फिर्यादीला लुटल्याचे कबुल केले. मात्र, हा गुन्हा त्यांनी केवळ मौजमजेसाठी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दोन महिन्यापूर्वी त्यांनी एका टेम्पो चालकालाही असेच मारहाण करत लुटल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांचे रेकॉर्ड तपासले असता एका भाजी विक्रेत्याला असेच गाडीने कट का मारला? म्हणून तिघांनी लुटल्याचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्याकडून दीड तोळ्याची सोन्याची साखळी जप्त केली असून आरोपींवर गुन्हा दाखल केला असून याचा पुढिल तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे हे करत आहेत.

ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे व सोन्याबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, सहायक पोलीस फौजदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, पोलीस हवालदार कैलास केंगले, योगेश शिंदे, बापू धुमाळ, विक्रम कुदळ, पोलीस नाईक रितेश कोळी, अरूण नरळे,चंद्रकांत गडदे,श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे, सुभाष गुरव तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार व पोलीस शिपाई पंडित यांनी केली.

Latest news
Related news