Pune : शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जाचे वाटप वेळेत करावे – विभागीय आयुक्त यांच्या सूचना

Banks should disburse crop loans to farmers on time, demands divisional commisssioner.

एमपीसी न्यूज – शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्जाचे वाटप वेळेत होण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप 2020-21 या वर्षातील खरीप हंगाम कर्ज वाटप व मान्सून कालावधीत धरणामधील पाण्याचे नियोजन व खबरदारीच्या उपाययोजना याबाबत विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

बैठकीला विभागीय सहनिबंधक संगिता डोंगरे, जलसंपदाचे मुख्य अभियंता विलास राजपूत, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, प्रताप जाधव, नैना बोंदार्डे, साधना सावरकर, त्रिगुन कुलकर्णी, जयंत पिंपळगावकर, पी. बी. पाटील तसेच संबंधित बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, दौलत देसाई, शेखर सिंह, अभिजीत चौधरी, मिलींद शंभरकर यांनी आपापल्या जिल्हयात करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती दिली. तसेच खरीप हंगामपूर्व करण्यात आलेल्या तयारीची देखील माहिती दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्हयांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 योजनेतील पात्र खातेदारांच्या यादीतील खाती निरंक झालेल्या व न झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाध्ये पीक कर्ज देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

त्यानुसार पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर या पाचही जिल्हयांतील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका तसेच खाजगी व ग्रामीण भागातील बँकांनी पीक वेळेत पीक कर्जाचे वाटप करावे.

तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी कमी प्रमाणात कर्ज वाटप असलेल्या बँकांचा विशेष आढावा घेवून इष्टांक पूर्ण करावा. शेतकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संबंधित विभागांनीही दक्ष राहावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मागील वर्षी पुण्याबरोबरच सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हयात निर्माण झालेल्या गंभीर पूर परिस्थितीमुळे येथील नागरिकांची गैरसोय झाली होती. या वर्षी पावसामुळे अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी.

मागील वर्षी विभागात सांगली व कोल्हापूर जिल्हयात गंभीर पुरपरिस्थिती उद्भवली होती, या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी यांनी धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करुन घ्यावे. तसेच विभागातील पाचही जिल्हयांच्या खरिप हंगाम कर्ज वाटपाचा जिल्हानिहाय आढावा घेतला.

शेतकऱ्यांना बि-बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.