Pune : नृत्य साधक असल्याचा अभिमान बाळगा – खासदार डॉ. सोनल मानसिंग

भाटे, अध्ये स्व . रोहिणी भाटे पुरस्काराने सन्मानित

एमपीसी न्यूज – “नृत्य कला आत्मसात करणे सोपे नव्हे. यासाठी शिष्याची पंचेंद्रिये जागृत असावी लागतात. नृत्य ही केवळ एक कला नसून समर्पण आहे. अशा अदभूत, अद्वितीय कलेचा ध्यास घेतलेल्या शिष्यांनी नृत्यसाधक असल्याचा अभिमान बाळगायला हवा. ” असा सल्ला ज्येष्ठ नृत्य कलाकार व खासदार डॉ. सोनल मानसिंग यांनी कलाकारांना दिला.

पुणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘गुरू रोहिणी भाटे पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी २०१७ साठीचा पुरस्कार कथक नृत्य गुरू शमा भाटे आणि २०१८ साठीचा पुरस्कार कथक नृत्य गुरू नीलिमा अध्ये यांना प्रदान करण्यात आला. शिल्पा दातार, सुजाता नातू, प्रशांत ऊरणकर, चिन्मय कोल्हटकर, नीला शर्मा, रमा कानिटकर, जफर मुल्ला, कौस्तुभ अत्रे, चारुदत्त फडके, मृण्मयी फाटक यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. महापौर मुक्ता टिळक, तालयोगी पं. सुरेश तळवलकर, नगरसेवक अजय खेडेकर, माधुरी सहस्रबुद्धे, मंजुषा खर्डेकर उपस्थित होते.

‘गुरू-शिष्य ही भारताला लाभलेली महान परंपरा आहे. जगाच्या पाठीवर कुठेही अशी परंपरा जोपासली जात नाही. हा विलक्षण वारसा आपण जतन करायला हवा. असेही मानसिंग यांनी सांगितले. अध्ये म्हणाल्या, ‘गुरू रोहिणी भाटेंचे अमर्याद संस्कार आणि त्यांचा अमूल्य सहवास लाभल्याने जीवनाचे सार्थक झाले. त्यांनी मला सर्वांगाने घडवलं. अशा माझ्या श्रध्दास्थान असणाऱ्या रोहिणीताईंच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे मोठे भाग्य समजते.’

एका गुरूच्या नावाचा पुरस्कार दुसऱ्या गुरूच्या उपस्थितीत मिळण्यासारखा आनंद नाही. गुरू रोहिणी भाटेंमुळे मी या कलेत रुजले. कथक नृत्याने जगणे शिकवले आणि जगण्याला कारण दिले. तळवलकर यांनी लय, तालाचे अखंड भांडार दिले. असे महान गुरू लाभल्याने च इतक्या वर्षांत अनेक चांगले शिष्य घडवता आले अशी भावना भाटे यांनी व्यक्त केली. उत्तरार्धात कथक मैफल रंगली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.

बेबीताईंनी कलेच्या संस्कारातून  उत्तम शिष्य घडविले:  तळवलकर
बेबीताई अर्थात गुरू रोहिणी भाटे यांनी आयुष्यभर कलेची मूल्ये जपली.  कला, साहित्य यांची अचूक सांगड त्यांनी घातली. शिष्य घडवणे कठीण असते. शिष्यांशिवाय कला पुढे जाऊ शकत नाही. हे जाणून बेबीताईंनी कलेच्या संस्कारातून उत्तम शिष्य घडविले, असे मत तळवलकर यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.