Ajit Pawar : ….कारण मी गद्दार नाही; वाचा अजित पवार असं का म्हणाले?

एमपीसी न्यूज : राज्यातील सत्ताधारी जरी सर्वसामान्यांचे सरकार आहे, असं सांगत असले तरी त्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी काही केलेलं अजून तरी दिसत नाही. दसरा मेळाव्याच्या भाषणात त्यांनी स्वतःहून माणसे आल्याचे म्हटलं होतं. मग असं असताना माणसे खुर्च्या सोडून का गेलेत? असा सवाल राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केला. मी सोमेश्वरच्या सभेत भाषण करत असताना शेवटच्या रांगेतील एकही माणूस उठला नाही. कारण मी गद्दारी करून आलो नाही असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. 
बीकेसी येथील दसऱ्याच्या मुहूर्तावर झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यातून अनेकजण परत जात असतानाचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्या घटनेचा संदर्भ देत अजित पवार बोलत होते.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, सद्यस्थितीत राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. मात्र, राज्यातील सत्ताधारी सध्या एकमेकांना गद्दार गद्दार म्हणण्यात व्यस्त आहेत. एकमेकांना गद्दार म्हटल्याने महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार आहेत का असेही त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हटलं आहे. अजित पवार म्हणाले राज्यात सध्या लोकशाहीचा खेळ खंडोबा सुरू आहे. कशी ही माणसं फोडली जात आहेत, कुणी काहीही करतात.. राज्यात अजिबात स्थिरता राहिली नसल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.