Pimpri News : बीले सादर करण्यापूर्वी अंदाजपत्रकीय तरतुदीबाबत खात्री करा, महापालिका आयुक्तांच्या विभागप्रमुखांना सुचना

...तर भविष्यात लेखा परिक्षण आक्षेप उपस्थित झाल्यास संबंधित विभागावर जबाबदारी  

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमार्फत विकास कामांची बीले पूर्तता करण्यासाठी लेखा विभागात सादर केली जातात. मात्र, काही विभागांकडून लेखा विभागात बीले सादर करताना त्रुटी राहतात. त्यासाठी विकास कामांची बीले लेखा विभागात सादर करण्यापूर्वी त्यांची तांत्रिक छाननी करावी. तसेच अंदाजपत्रकीय तरतुदीबाबत खात्री करावी. अन्यथा भविष्यात लेखा परिक्षण आक्षेप उपस्थित झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.    

महापालिकेच्या विविध विभागांमार्फत भांडवली, महसुली, आस्थापना किंवा आगाऊ बीले पूर्तता करण्यासाठी लेखा विभागात सादर केली जातात. महापालिकेच्या संबंधित विभागातील आहरण व वितरण अधिकारी यांनी लेखा विभागाकडून जारी केलेले आदेश, परिपत्रके, सरकारी निर्णयातील तरतुदींच्या अनुषंगाने परिपूर्ण बीले लेखा विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. तथापि, काही विभागांकडून लेखा विभागात बीले सादर करताना त्रुटी राहतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी परिपत्रकाद्वारे महत्वपूर्ण सुचना दिल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी वेळोवेळी जारी केलेल्या वित्तीय अधिकार प्रदान आदेशानुसार सक्षम अधिका-याची बीलावर स्वाक्षरी असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

स्थायी समिती सभा मान्य ठराव क्रमांक, दिनांक व मंजुर मर्यादेत खर्च रक्कम याबाबत खात्री करावी. विकास कामांची बीले लेखा विभागात सादर करण्यापूर्वी त्यांची तांत्रिक छाननी करावी. तसेच अंदाजपत्रकीय तरतुदीबाबत खात्री करावी. कामांचा कार्यारंभ आदेश व करारनाम्यातील अटी-शर्तीनुसार बीलांची तपासणी करावी. अटी-शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री झाल्यानंतरच बीले लेखा विभागाकडे सादर करावीत. विकासकामांच्या बीलातील बाबनिहाय परिमाण व देयकातील नमुद परिमाण यांची अचूक सांख्यिकी तपासणी करावी. कामाची गुणवत्ता प्रमाणपत्रे, लॅब रिपोर्ट, चलने व फोटो बीलासोबतच्या कागदपत्रांमध्ये समाविष्ट केली असल्याची खात्री करावी.

वस्तु व सेवा खरेदीबाबत कार्यारंभ आदेश किंवा करारनाम्यात नमुद परिमाण, दर, मुदतीत पुरवठा, विलंब दंड व अटी-शर्तीनुसार तपासणी करावी. त्यानंतरच अशी बीले लेखा विभागात पाठवावीत. सर्व महसुली बीलांसोबत आवश्यक ते दाखले असल्याची खात्री करावी. सर्व बीलांसोबत सादर करण्यात येणा-या चेकलिस्टवर अचूक माहिती नमुद करावी. आयुक्तांकडील परिपत्रकानुसार एफडीआर, डीमांड ड्राफ्ट, पीएसडी, बीजी यांच्या वैधतेबाबत विभागाची खात्री झाल्यावरच बीले लेखा विभागात सादर करावीत. या नमुद केलेल्या बाबी केवळ मार्गदर्शक सुचना आहेत. त्या व्यतिरिक्त बीले लेखा विभागास सादर करण्यापूर्वी ती परिपूर्ण व नियमानुसार असल्याची खात्री करावी. त्यानंतरच संबधित विभागप्रमुखांनी किंवा आहरण व वितरण अधिकारी यांनी लेखा विभागास बीले सादर करावीत.

संबंधित विभागांनी ही बीले मंजुर करताना योग्य असल्याची खात्री करूनच मंजुर करावीत आणि लेखा विभागास पूर्ततेसाठी सादर करावीत. अन्यथा विभागाने सादर केलेली बीले ही योग्य असल्याची व विभागाने खात्री केली आहे, असे समजून बीले मंजुर केली जातील. याबाबत भविष्यात लेखा परिक्षण आक्षेप उपस्थित झाल्यास त्याची जबाबदारी विभागावर राहील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि परिपत्रकातील सुचनांचे काटेकोर पालन करावे, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.