Behind the story: सत्याफेम रामगोपाल वर्मा पाच वर्षे शोधत होता ‘भिकू म्हात्रे’ला…

behind the story: struggle of satya fame actor manoj bajpayee bhiku mhatre

एमपीसी न्यूज- दिग्दर्शक रामगोपाल वर्माचा ‘सत्या’ हा अंडरवर्ल्डच्या भेदक वास्तवाबद्दल प्रसिद्ध असलेला एक चित्रपट. त्यात चक्रवर्ती या साऊथ स्टारची भूमिका सत्याची होती. पण यात भाव खाऊन गेला तो भिकू म्हात्रे.

‘सपनें मे मिलती है, ओ कुडी मेरी सपने में मिलती है’ म्हणत शेफाली शहाभोवती रावडी डान्स करणारा भिकू म्हात्रे इतकी वर्षे झाली तरी प्रेक्षक विसरले नाहीत.

पुढील काळात मनोज वाजपेयीला अनेक उत्तम भूमिकांमुळे प्रसिद्धी मिळाली. पण त्याचे खरे नाव झाले ते सत्यामुळेच. पण ही भूमिका मनोजला मिळण्यामागेदेखील एक स्टोरी आहे.

मनोज वाजपेयीने Lallantop ला दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. झालं असं होतं की, रामगोपाल वर्मा ‘दौड’ चित्रपटासाठी परेश रावल यांच्या ‘राइट हॅण्ड’च्या भूमिकेसाठी शोध घेत होते.

‘दौड’ चित्रपट लिहिण्याची जबाबदारी असणाऱ्या कनन अय्यर यांनी मनोज वाजपेयीला रामगोपाल वर्माला भेटण्यासाठी येण्यास सांगितलं होतं.

यावेळी त्यांनी मनोज वाजपेयीला हे देखील सांगितलं होतं की, रामगोपाल वर्माला जर एखादा अभिनेता आवडला तर तो मोठा रोलही देऊ शकतो. मनोज वाजपेयीने पैसे किती मिळणार विचारलं असता ३५ हजार मिळतील असं सांगितलं.

मनोज वाजपेयीनेही काही महिन्यांसाठी घऱाचं भाडं देण्याइतके पैसे मिळत असल्याने भेटण्याची तयारी दर्शवली. जेव्हा मनोज रामगोपाल वर्मांच्या ऑफिसात पोहोचले तेव्हा तिथे इरफान खान आणि विनीत कुमारही तिथे उपस्थित होते. दोघांशी बोलून झाल्यानंतर त्यांना सांगतो असे सांगून पाठवलं.

नंतर मनोज वाजपेयीचा नंबर आला, तेव्हा रामगोपाल वर्माने काय काय काम केलं आहे याबद्दल चौकशी केली. मनोज वाजपेयीने ‘बॅण्डिट क्वीन’ चित्रपटात काम केलं आहे सांगितल्यानंतर रामगोपाल वर्मा एकदम आश्चर्यचकित झाला.

‘मी दोन वेळा चित्रपट पाहिला आहे, तू कोणती भूमिका केली आहेस’, असं त्याने विचारलं. मनोज वाजपेयीने ‘डाकू मानसिंग’ची भूमिका सांगताच रामगोपाल वर्माचा विश्वासच बसेनासा झाला.

‘मी गेल्या पाच वर्षांपासून तुला शोधतोय, पण मला कोणीही तुझा नंबर, माहिती देत नव्हतं’, असं सांगितल्यावर मनोज वाजपेयीचाही विश्वास बसेना. कारण गेल्या पाच वर्षात त्याच्या भूमिकेचं एका व्यक्तीनेही कौतुक केलं नव्हतं.

सोबतच त्याच्यासोबत चित्रपटात असणाऱ्या सगळ्यांना कामं मिळाली होती. पण मनोज वाजपेयीला पाच वर्षात एकही काम मिळालं नव्हतं.

त्यानंतर रामगोपाल वर्माने यावेळी दौडमध्ये खूप छोटा रोल असून मी एक मोठा चित्रपट करणार असून त्यात तुला मोठी भूमिका देतो असं मनोजला सांगितलं. आधीच पाच वर्षे फारसे काम नसल्याने मनोज आश्वासनांचा कंटाळा आला होता.

त्यामुळे त्यांनी ‘दौड’ चित्रपटातील भूमिकापण करु द्या अशी विनंती केली. त्यावर रामगोपाल वर्मानेही ठीक आहे विश्वास नसेल तर कर असं म्हटलं. पण माझ्या पुढच्या चित्रपटात तुला मोठी भूमिका मिळणार हे नक्की आहे, असं आश्वासन दिलं.

त्यानंतर रामगोपाल वर्माने ‘सत्या’ चित्रपटाची तयारी सुरु केली आणि त्यामध्ये मनोज वाजपेयी यांना भिकू म्हात्रेची भूमिका दिली. ही भूमिका मुख्य भूमिकेपेक्षाही जास्त प्रसिद्ध झाली आणि मनोज वाजपेयी नावाचा हिरा बॉलिवूडला मिळाला. मात्र हिऱ्याप्रमाणेच मनोजला देखील तावून सुलाखून बाहेर पडावे लागले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.