Bhama Askhed Project News : ग्रामपंचायत निवडणुकांमुळे भामा आसखेड प्रकल्पाचे उद्घाटन पुढे ढकलण्याची नामुष्की !

एमपीसी न्यूज : पुण्याच्या पूर्व भागाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भामा आसखेड धरण प्रकल्प श्रेयवादाच्या कचाट्यात सापडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या वादामुळे प्रकल्पाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून अजित पवार की देवेंद्र फडणवीस याबाबतचा मुहूर्त लागत नव्हता. आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे भामा आसखेड धरण प्रकल्पाचे उद्घाटन पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.

भामा-आसखेड योजनेचे काम पूर्ण झाले आहे. पुढील काही दिवसांत हे पाणी धानोरी, कळस, टिंगरेनगर, येरवडा, विमाननगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, नगर रस्ता भागातील सुमारे 8 लाख नागरिकांना मिळणार आहे. मात्र, या पाण्याचा वाटा इतर भागांसाठी मागण्यात येत आहे.

हे पाणी आल्यानंतर नगर रस्त्याला पालिकेकडून पूर्वी देण्यात येणारे पाणी बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या प्रकारास नगरसेवक अनिल टिंगरे यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच हे पाणी हडपसर, वानवडीला वळविण्यासाठी नगरसेविका कालिंदा पुंडे या आक्रमक आहेत.

तर खडकी कँटोन्मेंटला हेच पाणी वळविण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे हेही आग्रही आहेत. एकूणच महापालिकेत सत्ताधारी भाजपामध्ये पक्षांतर्गत उभी फूट पडली आहे. तर वडगाव शेरीचे विद्यमान आमदार व माजी आमदारांमध्ये श्रेयासाठी वाक् युद्ध सुरू आहे.

उद्घाटनाचा संभाव्य मुहूर्त 20 डिसेंबर रोजी काढण्यात आला आहे. महापालिकेकडून जय्यत तयारी देखील सुरू आहे. परंतु, पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नव्हती.

याच दरम्यान राज्यभरात ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या असून सरपंचपदाचे आरक्षण रद्द केल्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.

भामा आसखेड धरणग्रस्तांचे पुनर्वसनाच्या मुद्द्यांवर त्या क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे राजकारण चांगलेच तापणार आहे. त्या पार्श्वभुमीवर भामा आसखेड धरण प्रकल्पाचे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.