Bhaskar Gokhale : स्वच्छतेसाठी तुमची केवळ दहा मिनिटे मागणारे उद्योगनगरीचे भास्कर गोखले

एमपीसी न्यूज – होय केवळ ‘दहा मिनिटे’ ती मग घरात काम करत-करत टिव्ही बघताना असू दे किंवा सकाळी मॉर्निंग वॉकला कानात हेडफोन घालून फिरताना असू देत. स्वच्छतेसाठी हवी आहेत; केवळ 10 मिनिटे..कारण गोखले (Bhaskar Gokhale) यांना तुमच्या इच्छेवर आणि कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. रावेत परिसरात मागील 12 वर्षापासून स्वच्छतेसाठी भास्कर गोखले हे धडपडत आहेत.

गोखले मुळचे कोल्हापूरचे; मात्र त्यांची कर्मभूमी ही उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड ठरली. इतर सामान्य नागरिकांप्रमाणे ते नोकरी करत होते. मार्केटींगचा जॉब असल्याने फिरणे आले. हेच फिरत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला असलेला कचरा व अगदी निर्धास्तपणे कचरा टाकणारे लोक नजरेला खटकत होते.

पण, काही तरी केले पाहिजे ही भावना सतत त्यांच्या मनत घोळत होती. त्यातून त्यांनी 2012 साली जॉब सोडला. बाबा आमटे यांच्या विचारांनी प्रभावीत झालेले गोखले आधीपासूनच आनंदवन संस्थेशी निगडीत होतेच, त्यांच्या प्रेरणेतून ते अनेक समाजोपयोगी कामे करत होते. त्यात आता भर पडली; ती स्वच्छता मोहिमेची. सकाळी चार ते पाच तास स्वच्छतेचे काम करणे व पुढे ‘आनंदवन’चे काम पहाणे हा त्यांचा 2015 पासून दैनंदिन नित्यक्रम झाला आहे.

सुरुवातीला लोक बघत होते आणि पुढे निघून जात (Bhaskar Gokhale) होते. मात्र, आता लोक थांबतात व काहीजण स्वच्छतेच्या कामाला हातभार लावतात. त्यातून दहा जणांची एक टीम गोखले यांच्यासोबत मनापासून जोडली गेली असून ते देखील रोज किंवा सुट्टीच्या दिवशी परिसरात स्वच्छतेची काम करतात.

Alandi Water Problem : पुरेसे पाणी असूनही आळंदीत वाढतोय का पाण्याचा तिढा???

एवढ्यावर गोखले यांना थांबयचे नाही, तर त्यांना रावेतप्रमाणे, ताथवडे, पुनावळे अशा आसपासच्या परिसरात काम करत शहराचा कायापालट करायचा आहे. हे करत असताना प्रशासनाकडून कोणतीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नाही. उलट त्यांना रोज सकाळी महापालिकेचे जे स्वच्छता कर्मचारी भेटतात; ते त्यांच्या बोलण्यातून व वागण्यातून आभार मानतात.  कारण गोखले यांनी केवळ त्यांचे काम हलके केले नाही; तर त्यांच्या कामाचे मोल देखील जाणले आहे.

कारण त्यांचे म्हणणे आहे की, यासाठी कोणाला विशेष आमंत्रण देण्याची गरज नाही; परिसर तुमचा आहे तुम्ही हवा तसा सुंदर परिसर घडवू शकता.

याविषयी बोलताना गोखले अगदी सकारात्मकतेने सांगतात की, मला विश्वास आहे की साऱ्यांनाच इतरांसाठी काही तरी करावे वाटते, प्रत्येकात काही तरी कला असते. त्याच कलेचा किंवा जाणीवेचा प्रत्येकाने वापर केला तर केवळ शहर नाही तर देश बदलू शकतो.

त्यासाठी तुमची नोकरी, संसार सोडायची काहीही गरज नाही. केवळ गरज आहे ती मनापासून किमान दहा मिनिटे तरी सामजसेवेला देण्याची. सकाळी व्यायाम करताना म्हणा, मित्रांसोबत गप्पा मारताना अगदी सहज तुम्ही कचरा उचलून कचरा कुंडीत टाकू शकता.

टीव्ही बघत बघत घरातील काही गोष्टी (Bhaskar Gokhale) कचऱ्यात जातील; त्यांच्या पुनर्वापराचा विचार करु शकता. ही भावना मूळात रुजावी यासाठी लवकरच श्रम संस्कार छावणी देखील सुरु करणार असून रावेत परिसरात एप्रिल महिन्याच्या शेवटी विद्यार्थी व तरुणांसाठी ही छावणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या समाजासाठी किंवा परिसरासाठी काय करु शकता, याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे.

लहान वयात मुलाना परोपकाराची भावना शिकवली तर ती त्यांची आयुष्यभराची पुंजी होते, असे गोखले यांचे मत आहे. त्यातून ते विद्यार्थ्यांकरवी प्लास्टीकबंदीसाठी थेट देशाचे पंतप्रधानांना पत्र लिहित उपाययोजनेसाठी आवाहन करणार आहेत.

या साऱ्या स्वप्नाबरोबरच रोज न थकता रस्त्याच्या कडेला कचरा उचलणे, झांडाची काळजी घेणे, हसतमुखाने नागरिकांना आपल्या कामात सामावून घेण्याचे काम ते करत आहेत. एक दिवस परिसर व परिसरातील नागरिक नक्की बदलतील असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या या विश्वासासाठी काढाल ना तुम्ही तुमची फक्त दहा मिनिटे???

(अधिक माहितीसाठी संपर्क – [email protected], 8788549340)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.