Alandi Water Problem : पुरेसे पाणी असूनही आळंदीत वाढतोय का पाण्याचा तिढा???

एमपीसी न्यूज : आळंदी शहराला (Alandi Water Problem) पाणी पुरवठा करणाऱ्या भामा आसखेड केंद्रावरील जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी 19 जानेवारीला संपूर्ण पुणे शहर व आळंदी नगरपरिषद हद्दीतील पाणी वितरण बंद राहिले होते. तर, आळंदीमध्ये शुक्रवारी 20 जानेवारी रोजी रोटेशन प्रमाणे आळंदी गावठाण व हवेली विभागात उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार होता. परंतु, कुरुळी ते आळंदी जलवाहिनीवरील वॉटर वॉलच्या तांत्रिक अडचणीमुळे 20 जानेवारीलाही पाणी पुरवठा होऊ शकला नाही.

त्यामुळे आळंदी शहरातील काही नागरिकांनी विकतचे पानी घेऊन घरातील कामे पूर्ण केली. तर संस्थानने पाण्याची सोय केली होती, त्या ठिकाणी माऊली बागेजवळ काल संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत होती.

मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्या कार्यकालात त्यांनी डिसेंबर 2019 मध्ये इंद्रायणी नदी पात्रातील दूषित पाणी पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणेवर ताण येत असल्याने आळंदी शहरात गावठाण व हवेली असे दोन विभाग करत शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. परंतु, आता पुणे शहराला भामा आसखेड धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी दिले जाते. त्यालाच कुरुळी येथील जॅकवेलला टॅप मारून 2022 पासून आळंदीला पाणी पुरविले जात आहे.

2019 मध्ये दूषित पाण्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रावर ताण निर्माण होत असल्याने दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, आता भामा आसखेड धरणातील पाणी जलवाहिनीद्वारे आळंदी शहराला मिळत असूनसुद्धा शहरात दिवसाआड पाणीपुरवठा का? हा प्रश्न गावात अजूनही अनुत्तरित आहे.

तसेच, शहरात मंगळवारनंतर हवेली विभागाला तर बुधवार नंतर गावठाण विभागात पाणीपुरवठा झालेला नसल्याने पाण्यावाचून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मागे (Alandi Water Problem) काही महिन्यापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. भामा आसखेड येथील तांत्रिक अडचणीमुळे आळंदी शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता.

Pune : हिंदू जनजागृती समितीतर्फे विद्यार्थिनींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन

त्यानंतर सुद्धा कुरुळी ते आळंदी येथील वॉटर वॉलच्या तांत्रिक अडचणीमुळे आळंदी शहराला पाणीपुरवठा वेळेत होऊ शकला नव्हता. बाहेरील तज्ञ कर्मचारी टीमद्वारे तेव्हा तेथील तांत्रिक अडचण सोडवण्यात यश मिळाले होते. सद्यस्थितीत एअर पकडल्यामुळे जलवाहिनीमधून पुढे पाणी जात नाही. तेथील काम पूर्ण झाल्यानंतरच आळंदी जलशुद्धीकरणाला पाणीपुरवठा होणार आहे.

त्यानंतर शहरात पाणीपुरवठा होणार आहे. वॉटर वॉल, एअर ब्लॉक अडचणीमुळे भविष्यात शहरात पाणीपुरवठा उशिरा होणार नाही याची दक्षता घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.