Pimpri News : महापालिकेची होर्डिंग सर्वेक्षण मोहीम सुरू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri News) काही होर्डिंग चालकांनी परवानगीपेक्षा जास्त आकाराचे होर्डिंग उभारले आहेत. तसेच अनधिकृत किंवा एकाच परवानगीवर दोन होर्डिंग सुरू असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या वतीने शहरातील सर्वच होर्डिंगचे नव्याने सर्वेक्षण हाती घेतले आहे. त्यानुसार अ, ड आणि फ या तीन प्रभागातील 600 पेक्षा जास्त होर्डिंगचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित पाच प्रभागातील सर्वेक्षण येत्या आठ दिवसांत पूर्ण करणार असल्याची माहिती आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांनी दिली.

शहरात गेल्या काही वर्षांपासून होर्डिंगबाजीचे प्रमाण वाढले आहे. नेत्यांचे वाढदिवस, लग्न समारंभासह, जयंती, पुण्यतिथी, श्रद्धांजलीसह आदी कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात होर्डिंगबाजी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामधील काही फलक हे अधिकृत असतात तर काही होर्डिंग अनधिकृत असतात. मात्र, पालिकेचा आकाश चिन्ह परवाना विभागाकडून अनधिकृत होर्डिंगवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

तर काही होर्डिंग चालकांनी परवानगीपेक्षा जास्त आकाराचे होर्डिंग उभारले आहेत. त्यामुळेच आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या वतीने होर्डिंगचे नव्याने सर्व्हेक्षण हाती घेण्यात आले आहे. सर्वेक्षणावेळी होर्डिंग चालकांच्या प्रतिनिधीसह जागेवरच पंचनामा करण्यात येत आहे.

शहरात सध्या 1 हजार 812 होर्डिंग आहेत. यामधील 433 होर्डिंग होर्डिंगचा वाद न्यायालयात असून या होर्डिंगला जैसे थे ठेवण्याचे आदेश आहेत. सद्यस्थितीत 1100 होर्डिंग चालकांनी परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. मात्र, 212 होर्डिंग चालकांनी अद्याप होर्डिंग नुतनीकरण करण्यासाठी अर्ज केले (Pimpri News) नाहीत. 2022-23 या चालू आर्थिक वर्षांतील 1 एप्रिलपासून वसुली बंद होती.

Pune : हिंदू जनजागृती समितीतर्फे विद्यार्थिनींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन

एक महिन्यांपासून वसुली सुरू झाली असून एका महिन्यात तब्बल 8 कोटी 37 लाख रूपये वसुल करण्यात आले आहेत. तसेच ज्या होर्डिंग चालकांनी अद्याप होर्डिंग नूतनीकरण करण्यासाठी अर्ज केले नाहीत. त्यांनी लवकरात-लवकर नूतनीकरणासाठी अर्ज करावेत. 31 मार्चपर्यंत अर्ज न केल्यास हे होर्डिंग काढून नियमाप्रमाणे भंगारात विक्री करून थकीत पैसे वसूल केले जातील, असा इशारा उपायुक्त ढोले यांनी दिला आहे.

उपायुक्त सचिन ढोले म्हणाले, ”शहरातील सर्व होर्डिंगचे जागेवर जाऊन सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. काही होर्डिंग चालकांनी परवानगीपेक्षा जास्त आकाराचे होर्डिंग उभारले आहेत. होर्डिंग चालकांच्या प्रतिनिधीसह जागेवरच पंचनामा करण्यात येत आहे. त्यांना आकार कमी करण्यासंदर्भात नोटीसही देण्यात येत आहे. तसेच अवघ्या एका महिन्यात 8 कोटी 37 लाख रूपयांची वसुली करण्यात आली आहे. उर्वरित सव्वा दोन महिन्यांत जास्तीत-जास्त वसुली करण्याचा आकाश चिन्ह व परवाना विभागाचे प्रयत्न असणार आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.