Bhosari Crime News : आरटीओ मधील काम करुन देण्यासाठी लाच घेताना खाजगी एजंटला अटक

एमपीसी न्यूज – प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कामे करून देण्यासाठी एक हजार 300 रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी एका खाजगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून अटक केली.

त्याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 11) रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.अक्षय मारुती माळवे (वय 24, रा. गंगानगर, आकुर्डी) असे लाच घेतलेल्या खाजगी एजंटचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना त्यांच्या मित्राची गाडी पिंपरी चिंचवड आरटीओ कडून पुणे आरटीओकडे ट्रान्सफर करायची आहे. त्यासाठी त्यांना पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. दरम्यान, आरोपी अक्षय याने प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी खर्च येईल असे सांगत त्यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली.

त्यानंतर त्यांच्यात तडजोड होऊन एक हजार 300 रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, याविरोधात तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क करून माहिती दिली. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सोमवारी रात्री अक्षय याला एक हजार 300 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

आरोपी अक्षय विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक सुनील बिले पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.