Bhosari: कोरोनाविरोधातील लढाईत भोसरी रुग्णालयाचा मोठा सहभाग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भोसरीतील 100 खाटांचे नवीन रुग्णालय सध्या कोरोनाचा संसर्ग झालेल्यांसाठी जीवनसाथी ठरत आहे. या रुग्णालयातून कोरोनाचे रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी रुग्णालयातील टीम कौतुकास्पद कार्य करत आहे. वायसीएमच्या बरोबरीने भोसरी रुग्णालय कोरोनाविरोधातील युद्धाचा यशस्वी मुकाबला करत दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भोसरीत 100 खाटांचे चार मजली सुस्सज रुग्णालय उभारण्यात आले आहे. भोसरीसह समाविष्ट भागांतील मोशी, चिखली, च-होली, वडमुखवाडी, डुडुळगाव परिसरांतील सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात वैद्यकीय उपचार मिळावेत या उद्देशाने आणि वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी हे रुग्णालय उभारले आहे. कोरोनाच्या लढाईत रुग्णालयाने वायसीएमवरील ताण कमी केला आहे. या रुग्णालयाचे उद्‌घाटन अद्याप व्हायचे आहे;  मात्र कोरोना संसर्ग झालेल्यांसाठी आयसोलेशन व संशयितांसाठी क्वारंटाइन कक्ष या रुग्णालयात सुरु केला आहे. कोरोना बाधित रुग्णांवर रुग्णालयात यशस्वी उपचार केले जात आहे. रुग्णालयातून संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत.

कोणतीही लस उपलब्ध नसताना कोरोना बाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवून इच्छाशक्ती प्रबळ केली जात आहे. डॉक्‍टर, नर्स यांच्याकडून योग्य उपचार व मार्गदर्शन रुग्णांना मिळत आहे. आतापर्यंत चौदा दिवस उपचार घेऊन भोसरी रुग्णालयातून काही रुग्ण घरी गेले आहेत. यामुळे भोसरीतील रुग्णालयाचे नागरिकांना महत्व पटू लागले आहे. तसेच राजकीय लोकप्रतिनीधी देखील आता रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट सोडून देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.