Bhosari : रुग्णालयाच्या खासगीकरणास वाढता विरोध; तीन महिन्यांनी पुन्हा विचारार्थ महासभेसमोर प्रस्ताव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीत उभारलेले रुग्णालय खासगी संस्थेला 30 वर्षे चालवायला देण्याच्या प्रस्तावाला गोंधळात महासभेने मान्यता दिली. परंतु, रुग्णालयाच्या खासगीकरणास राष्ट्रवादी काँग्रेस, विविध सामाजिक संघटनासह भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी देखील त्याला विरोध केला आहे. वाढता विरोध पाहता खासगीकरणाच्या प्रस्तावाची तीन महिने अंमलबजावणी केली जाणार नाही. त्यानंतर महासभेसमोर विचारार्थ हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. याबाबतचे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप नगरसेवक रवी लांडगे यांना दिले.

महापालिकेच्या वतीने भोसरीत 100 बेडचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. मात्र अपु-या मनुष्यबळाचे कारण पुढे करत ते खासगी संस्थेला 30 वर्षांकरिता चालवायला देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर केला आहे. स्थानिक नगरसेवक असताना या प्रस्तावची कल्पना न देता, तसेच सर्वसाधारण सभेपूर्वी झालेल्या पक्ष बैठकीला देखील बोलविले नसल्याचा आरोप रवी लांडगे यांनी या पत्रकार परिषदेत केला. याशिवाय काही ठराविक पदाधिकारीच महत्वाचे निर्णय घेत असून, अन्य नगरसेवकांना विश्‍वासात घेत नसल्याचा आरोपही केला.

रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध असल्याचे निवेदन देऊनही आयुक्‍तांकडून त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपने घेतलेल्या या चुकीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. भाजपच्या वतीने चुकीचे निर्णय घेतले गेल्यास, भविष्यातही त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा लांडगे यांनी यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.