Bhosari : स्पाईन रोड बधितांना मिळाला भूखंड; प्रश्न कायमचा निकाली

एमपीसी न्यूज – तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकातून जाणाऱ्या स्पाईन रस्त्यात बाधित होणाऱ्या रहिवाशांच्या रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. 126 स्पाईन रोड बाधित रहिवाशांना शासनाकडून भूखंड मिळाला आहे. आमदार महेश लांडगे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून हा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे.

स्पाईन रस्ता विकसित करत असताना त्रिवेणीनगर चौकातील काही घरे बाधित होत होती. त्या बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा करुन जागा मंजूर करुन घेतली. या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेली प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 11 मधील 14 हजार 784 चौरसमीटर जागा यापूर्वीच प्राधिकरणाने 9 हजार 350 रुपये प्रति चौरस मीटर या दराने महापालिकेच्या ताब्यात दिली होती.

या भूखंडावर महापालिकेने स्पाईन रोड बाधितांचे पुर्नवसन हाती घेतले होते. तथापि, ही जागा पुनर्वसनाठी अपुरी पडत होती. आमदार लांडगे यांनी पाठपुरावा करत पीसीएनटीडीएकडून 6 हजार 282.72 चौरस मीटर वाढीव क्षेत्रफळाचा भुखंड उपलब्ध करुन घेतला.

बाधितांच्या पुनर्वसनासाठी प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक 11 मधील पर्यायी निवासी जागा मंजूर करण्यात आली. 75 मीटर स्पाईन रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 52 मीटर ते 60 मीटर रस्ता बाधितांच्या पुनर्वसनासाठी नगररचना विभागामार्फत 126 जणांची अंतिम यादी तयार करण्यात आली. त्यापैकी 77 लाभार्थ्यांची सोडत 27 ऑगस्ट 2018 रोजी काढण्यात आली होती. उर्वरित 46 लाभार्थ्यांची सोडत 2019 मध्ये मार्गी लागली आहे. त्यामुळे बाधितांना भूखंड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तळवडे येथील नागरिक ज्ञानेश्वर बरगे म्हणाले, “2005 पासूनचा हा प्रश्न आहे. 2014-15 मध्ये त्याला आमदार महेश लांडगे यांनी गती दिली होती. त्यावेळी स्पाईन रोड बाधितांना मिळालेल्या जागेवर मूळ मालकाने दावा दाखल केला होता. संबंधित जागादेखील कमी होती. त्यामुळे वाढीव जागा देण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी लावून धरली. त्याबाबत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेत नागरिकांना दिलासा दिला आहे. त्यामुळे स्पाईन रस्ता बांधित रहिवाशांना प्राधिकरण कार्यक्षेत्रात प्रत्येकी 1 हजार 250 चौरस फूट जागा देवून पुनर्वसनाचा प्रश्न सोडविला आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.