Bhosari : गोठ्यातील कामगार पळविण्यावरून तरुणावर कोयत्याने वार; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – गोठ्यातील कामगार पळविण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना भोसरीतील वाळकेमळा येथे सोमवारी (दि. 16) सायंकाळी घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

पंडीत नामदेव परांडे (वय 42), राजेंद्र नामदेव परांडे, महादू नामदेव परांडे, ऋषीकेश नितीन फुगे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच दोन बिहारी (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू नंदकुमार परांडे (वय 25, रा. दिघी गावठाण, दिघी) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्यांनी मंगळवारी (दि. 17) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचा दुधाचा व्यवसाय असून, जनावरांचा गोठाही आहे. या दोघांमध्ये एकमेकांचे कामगार पळविण्यावरून वाद आहे. याच वादातून सोमवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी बापू परांडे यांच्यावर लोखंडी रॉड, कोयता आणि लाकडी बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.