Talegaon: महाराष्ट्र ही भक्ती, शक्तीची भूमी आहे – प्रदीप कदम

एमपीसी न्यूज – संतसाहित्य हे कालातीत असून वर्तमानकाळातही आपल्याला त्याचा अन्वयार्थ लावता येतो. ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे रममाण होणे याचाच अर्थ ‘भारत’ ही तेजोभूमी आहे. त्यातील महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानोबा हे संतपरंपरेचा पाया असून तुकोबा हे तिचा कळस आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते प्रदीप कदम यांनी केले.

श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित दोन दिवसीय गणेश व्याख्यानमालेत ‘भक्ती आणि शक्ती’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना सोमवारी (दि.16) तळेगाव स्टेशन येथे प्रदीप कदम बोलत होते. यावेळी उद्योजक प्रदीप गटे अध्यक्षस्थानी होते. पंडीत किरण परळीकर, नगरसेविका काजल गटे, माजी नगराध्यक्षा संगीता धोत्रे, निवेदक अनिल धर्माधिकारी, श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले, सचिव दिलीप राजगुरव यांची मुख्य उपस्थिती होती.

प्रदीप कदम म्हणाले, इंद्रायणी, भीमा, भामा, पवना या नद्या संस्कृतीच्या प्रवाहक आहेत. आपले पौराणिक ग्रंथ आणि संतसाहित्य यामधील अध्यात्म आम्हाला कोणत्याही व्यक्तीच्या बाह्य सौंदर्यापेक्षा त्याचे अंतर्गत चैतन्य ओळखायला शिकवते आणि कृतिप्रवण करते.

त्यामुळे कोणतेही दोन वारकरी समोरासमोर आल्यावर एकमेकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन व्यक्तीमधल्या ईश्वराची अनुभूती देतात. इतिहास, वर्तमान आणि भविष्य याचा सुरेख संगम संतसाहित्यात आढळतो आणि याचा प्रत्यय ज्ञानेश्वरी, तुकोबाची गाथा सदैव देतात.

छत्रपती शिवाजी महाराज बालवयात अध्यात्माने प्रभावित होऊन भक्तिमार्गात जीवन व्यतीत करण्याच्या निर्णयाप्रती आले होते; परंतु जिजाऊ माँसाहेबांनी संत तुकोबांच्या माध्यमातून त्यांना शक्तिमार्गाकडे वळवले. तुकोबांची भक्ती आणि शिवबांची शक्ती यांच्या संगमातून स्वराज्याची आणि महाराष्ट्राची जडणघडण झाली. यामुळे महाराष्ट्र ही भक्ती-शक्तीची भूमी म्हणून जगात ओळखली जाते असे कदम म्हणाले.

याप्रसंगी गणेश व्याख्यानमालेसाठी प्रेरणा देणारे ज्येष्ठ व्याख्याते आणि व्याख्यानमाला समिती समन्वयक राजेंद्र घावटे यांना किरण परळीकर यांच्या हस्ते कृतज्ञता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच ह.भ.प. शांताराम महाराज जावळीकर, अपूर्वा बांदल, वैद्य ज्योती मुंदरगी यांना प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.