Bhosri Crime : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज – बालाजीनगर चौक, भोसरी येथे एका टोळक्याने तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा केला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात 18 ऑक्टोबर रोजी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यातील एका आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. अभिषेक सुरेश देवकर (वय 20, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक देवकर भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर थांबला असल्याची माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस हवालदार निशांत काळे आणि पोलीस शिपाई सुधीर डोळस यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून देवकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. देवकर याला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तलवारीने केक कापण्याची घटना 5 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास बालाजीनगर चौक, टेल्को रोड, भोसरी येथे घडली. स्वप्नील पोटभरे, महेंद्र सरवदे यांनी तलवारीने केक कापून वाढदिवस त्याचे प्रदर्शन केले. यावेळी देवकर आणि अन्य आरोपी तिथे उपस्थित होते. या घटनेला घडून तब्बल दोन आठवड्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.